Categories

Most Viewed

21 जुलै 1942 भाषण

मी तीन गोष्टी होऊ देणार नाही

डॉ. बी. आर. आंबेडकर हे व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळावर काल अधिकारारूढ झाले व त्यानंतर आज दिनांक 21 जुलै 1942 रोजी नॅशनल सीमेन्स युनियन मुंबई तर्फे ताजमहाल हॉटेलमध्ये झालेल्या सत्कार समारंभाच्या वेळी मजूर खात्याचे मंत्री या नात्याने मुंबईतील पहिले जाहीर भाषण त्यांनी केले.

आपण स्वतः मजूर वर्गातले असून मजुरांच्या भावना आणि आकांक्षा याच आपल्या आकाक्षा आणि भावना आहेत असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, आपली ज्या कार्यकारी मंडळावर नेमणूक झाली आहे. ते कार्यकारी मंडळ मुख्यतः युद्ध प्रयत्नासाठी आहे आणि लोकमतानुवर्ती पक्षांचे नसून संमिश्र स्वरूपाचे असल्यामुळे तेथील बहुमतावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहातील.

तथापि, काही झाले तरी मी तीन गोष्टी निश्चितपणे होऊ देणार नाही. कामगारांचे रहाणीचे प्रमाण आहे त्यापेक्षा कमी होऊ देणार नाही आणि व्यवस्थित व सुसंस्कृत रितीने पहाता येईल इतके ते प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करीन. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय युद्ध प्रयत्नात इतरांच्या प्रमाणापेक्षा अधिक स्वार्थ त्यागाचा बोजा मी कामगारांवर पडू देणार नाही. तिसरी गोष्ट अशी की, संकटाच्या परिस्थितीच्या नावाखाली तात्पुरती काही नियंत्रणे कामगारांना सहन करावी लागली तरी कामगारांच्या स्वातंत्र्याला बाध आणणाऱ्या अशा नियंत्रणाला मी कायद्याच्या बुकात समावेश होऊ देणार नाही. त्यांनी पुढे मालक व मजूर यांच्या झगड्यात आपली सहानुभूती नेहमी मजूराकडेच राहील असेही आश्वासन दिले.

नॅशनल सीमेन्स युनियनतर्फे डॉ. आंबेडकर यांचा सन्मान करताना मि. मिर्झा अखार हुसेन व खा. ब. महंमद इ. साईत यांनी हिंदी खलाशांच्या अडचणी आणि तक्रारी त्यांच्या पुढे मांडल्या होत्या. त्यांना उत्तर देताना डॉ. आंबेडकर यांनी या तक्रारी अधिकृत रीतीने आपल्याकडे पाठवून देण्याची सूचना केली. ते म्हणाले की, हिंदुस्थानचा किनारा शत्रुच्या हल्ल्याला केव्हाही उघडा असा असल्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने या देशातील खलाशी व नावाडी यांन सैनिकापेक्षा अधिक महत्व आहे.

सन्मान समारंभाला बरेच प्रतिष्ठित, निमंत्रित व स्थानिक अधिकारी हजर होते.

सदर भाषण दैनिक नवाकाळ, मुंबई वृत्तपत्रात दिनांक 23 जुलै 1942 रोजी प्रसिद्ध झाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password