Categories

Most Viewed

03 जुलै 1927 भाषण

रविवार तारीख 3 जुलै 1927 रोजी मुंबई शहरातील सर्व बहिष्कृत वर्गाची जाहीरसभा महाड येथे अत्याचाराचा निषेध व त्यासंबंधी पुढे काय करावयाचे हे ठरविण्याकरिता सर कावसजी जहांगीर हॉल येथे भरली होती. सभेचे अध्यक्षस्थान डॉ. भीमराव आंबेडकर एम्. ए., पीएच. डी., डी. एससी., बार अटें लॉ., एम. एल. सी. ह्यांनी सुशोभित केले होते. सभेला बहिष्कृत वर्गातील निरनिराळ्या जातीतील प्रमुख लोक हजर असून, ब्राह्मण ब्राह्मणेतर पत्राचे संपादक देवराव नाईक, सो. स. लीगचे एक आस्थेवाईक वर्कर गं. नी. सहस्त्रबुद्धे व मद्रासकडील गीतानंद ब्रह्मचारी अशी मंडळी हजर होती. समेत खाली लिहिल्याप्रमाणे ठराव पास झाले.

ठराव 1. अस्पृश्य वर्गाच्या तक्रारी व त्यांच्यावर होत असलेला अन्याय यांचे सरकारकडून योग्यप्रकारे निवारण व्हावे, तसेच सरकारने अस्पृश्योन्नती प्रित्यर्थ वेळोवेळी केलेले ठराव व पुढे होणारे ठराव यांची कसून अमलबजावणी व्हावी याकरिता सरकारने मद्रास इलाख्याप्रमाणे मुंबई इलाख्यातही एक स्वतंत्र अधिकारी नेमावा अशी या सभेची मागणी आहे.

ठराव 2. बहिष्कृत हितकारिणी सभेने महाड येथे सत्याग्रह करण्याची योजना केली आहे. तिला या सभेचा पूर्ण पाठिंबा आहे. या सत्याग्रहात भाग घ्यावा अशी ही सभा बहिष्कृत वर्गातील सर्व जातींच्या लोकांना विनंती करीत आहे.

वरील ठरावांवर मेसर्स वनमाळी, मोहिते, मारवाडी मास्तर, खोलवडीकर, गोविंदजी माधवदास, गंगावणे, गायकवाड, जाधव वगैरे गृहस्थांची भाषणे झाल्यावर अध्यक्षांनी श्रीयुत नाईक व गीतानंद ब्रह्मचारी यांना भाषणे करण्याची विनंती केली. त्या दोघांनीही आपल्या भाषणात सांगितले की, “तुम्ही आपले मानवी हक्क प्राप्त करून घेण्याकरिता शक्य तितके प्रयत्न केले पाहिजेत. वरिष्ठ वर्गांचे लोक हे तोंडपाटिलकी करणारे आहेत. त्यांना जर तुमच्याबद्दल खरी कळकळ वाटती तर ह्या सभेचे आमंत्रण सर्व वर्तमानपत्रातून जाहीर झाले असता वरिष्ठ वर्गांपैकी कोणीच सभेला येऊ नये ही मोठी खेदकारक गोष्ट आहे. अशा सभातून हिंदू महासभेच्या चालकांनी अवश्य भाग घ्यावयास पाहिजे. परंतु ते जर तुमच्यात भाग घेत नाहीत तरी तुम्ही स्वस्थ बसू नका. तुम्हाला जर कोणी अस्पृश्य म्हणाला तर त्यालाही तुम्ही ज्याप्रमाणे बदकाला पाण्यात बुडवून वरखाली करतात त्याप्रमाणे तुम्हीही जो कोणी अस्पृश्य म्हणेल त्यास त्याच्या दंडाला धरून पाण्यात वरखाली करून बुचकळा. ते येथपर्यंत करा की, तो मनुष्य पुन्हा तुम्हाला अस्पृश्य म्हणणार नाही”. नंतर सभेचे अध्यक्ष आंबेडकर यांचे भाषण झाले. आपल्या भाषणात ते म्हणाले,

“आपण आता दोन्ही ठराव टाळ्यांच्या गजरात पास केले आहेत. परंतु त्यापैकी दुसऱ्या ठरावा संबंधाने आपणाला पुरेशी माहिती झालेली दिसत नाही. दुसरा ठराव सत्याग्रह करण्यासंबंधाचा आहे. सत्याग्रह म्हणजे पण लढाई. पण ही लढाई तलवार, बंदुक, तोफा, बांबगोळे या साधनांनी करावयाची नाही. तर ही लढाई शस्त्रविरहित करावयाची आहे. ज्याप्रमाणे पतुल्लाखली. वैकोम वगैरे ठिकाणी लोकांनी सत्याग्रह केला, त्याचप्रमाणे आपणालाही महाडला सत्याग्रह करावयाचा आहे. हा सत्याग्रह करताना कदाचित सरकार शांतता भंग होऊ नये म्हणून आपणाला कोणत्यातरी कलमाखाली पकडून तुरुंगात घालील. तर तुरुंगात जाण्याकरिता तुमची तयारी पाहिजे. ज्यांना आपल्या बायकामुलांची काळजी वाहावयाची असेल अशा लोकांनी सत्याग्रहात मुळीच भाग घेऊ नये मी आपणास निक्षून सांगतो. आम्हाला सत्याग्रहात जी माणसे पाहिजेत ती निधड्या छातीची स्वाभिमानी अशी पाहिजेत. अस्पृश्यता हा आपल्या देशावरील कलंक आहे, तो मी घालवीनच घालवीन असा ज्यांचा पक्का निर्धार झाला असेल अशाच लोकांनी आपली नावे सत्याग्रहात नोंदवावी व अशा निर्धाराची माणसे बहिष्कृत समाजातून निघतील अशी आपणास आशा आहे”.

अशा अर्थाचे भाषण केल्यावर श्री सीताराम नामदेव शिवतरकर यांनी सर्वांचे आभार मानले. आभार मानताना ते म्हणाले की, “आज ह्या सभेला बहिष्कृत वर्गातील सर्व जातीचे लोक, तसेच गीतानंद ब्रह्मचारी रा. नाईक व सहस्त्रबुद्धे आल्याबद्दल आम्ही त्यांचे फार आभारी आहो. महाड प्रकरणाबद्दलची ही शेवटची सभा आहे. यापुढे महाड प्रकरणाबद्दल सभा भरविली जाणार नाही. परंतु आजच्या सभेत पास झालेल्या ठरावाप्रमाणे सत्याग्रहाची तयारी करावयाची आहे. हा सत्याग्रह पावसाळा संपल्यावर आम्ही करणार आहो. तरी अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांना आपले नाव सत्याग्रहात नोंदवावयाचे असेल त्यांनी दामोदर हॉल, परळ, येथे बहिष्कृत हितकारिणी सभेच्या ऑफीसमध्ये नोंदवावे”.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password