Categories

Most Viewed

02 जुलै 1939 भाषण

दिनांक 02 जुलै 1939 :

आजची सभा रोहिदास समाजातील निरनिराळ्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास बक्षिसे वाटण्याकरिता भरणार आहे अशी माझी समजूत होती आणि म्हणूनच मी सभेस हजर राहिलो. पण या सभेत तशा प्रकारचा समारंभ आहे असे दिसत नाही. म्हणून मी आपल्यापुढे लहानसे भाषण करीत आहे.

प्रथमतः मला प्रामुख्याने सांगावयाचे म्हणजे मी कोणत्याच विशिष्ट जातीच्या चळवळीत भाग घेत नाही. मी सार्वजनिक कामाला आरंभ केल्यापासून जातीनिष्ठ मनोभूमिका कधीच ठेविली नाही. मी महार म्हणून जन्माला आलो असलो तरी महार जात टिकवावी म्हणून मी प्रयत्न करीत नाही. मी चालविलेल्या जनता पत्रात तशा प्रकारची मी कधीही शिकवण दिली नाही. मला महार म्हणून काय उज्ज्वल स्मृती कायम ठेवावयाची आहे ? महारांनी जातीबंधने तोडून टाकावी म्हणूनच मी सदोदित आटापिटा करीत असतो. मी आणि माझे अनुयायी मांग, भंगी, चांभार इत्यादी भिन्नजातींशी रोटी व्यवहार सर्रास करतो व जो जातीभेद मानील त्याचा तीव्र निषेध करतो व इतर जातींनीही तोच उपक्रम करावा म्हणून हमखास सांगत असतो. भिन्न जातीत विवाह व्हावे म्हणून आम्ही सतत प्रचार करीत असतो. पण विवाह ही काही जबरीने घडवून आणण्याची बाब नसल्यामुळे एखादी महाराची मुलगी व मांगाचा किंवा चांभाराचा अगर भंग्याचा मुलगा यांना झाडाशी बांधून व घागर घागर त्यांच्यावर पाणी ओतून काही त्यांचे लग्न लावावयाचे नाही. तथापि, जर भिन्न जातीतील वधुवरे स्वखुशीने विवाह लावीत असतील तर त्यास मी हरएक प्रकारे उत्तेजन देईन व त्यांच्यावर होणारा सामाजिक जुलूम कमी करण्याचा प्रयत्न करीन. हे झाले सामाजिक बाबीसंबंधी. राजकीय बाबतीत मी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आहे. तो पक्ष सर्वांना मोकळा आहे. आता त्या पक्षात महारांचा भरणा अधिक आहे. पण त्याचा दोष माझेकडे नाही. महारांची लोकसंख्याच अधिक असल्यामुळे ते अधिक जमावाने त्यात सामील झाले आहेत. मी काही चांभारांना तुम्ही माझे पक्षात या असे सांगत नाही किंवा आग्रह करीत नाही. ज्याला पक्षाची तत्त्वे पसंत पडतील, ज्यांना त्याचा कार्यक्रम मान्य होईल ते आपोआप येतील अशी माझी खात्री आहे. चांभारांना जर असे वाटत असेल की आपण काँग्रेसमध्ये जावे तर त्यांनी खुशाल जावे. पण त्यांना एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, ती ही की, त्यांना जी आज काँग्रेसमध्ये किंमत आहे ती जर आम्ही काँग्रेसमध्ये सामील झालो तर कायम राहिल का ? मी आज काँग्रेसच्या बाहेर आहे त्यामुळे त्यांना काँग्रेसवाले जवळ करीत आहेत. काँग्रेसवाले माझा द्वेष करतात म्हणून ते तुमच्यावर प्रेमाची साखर पेरतात. काँग्रेसमध्ये जाणे मला काही फार कठीण नाही. तसे जर मी केले तर आज जे तुम्ही सामील आहात त्यांची काय स्थिती होईल याचा त्यांनी विचार करावा. आमच्यापैकी एकाला दिवाणगिरी मिळाली असती. आज सोनगावकर किंवा तळकर काँग्रेसमध्ये सामील झाले असून देखील त्यांची काय स्थिती आहे ? हात वर करण्यापलिकडे त्यांना काय किंमत आहे ?

काही चांभार लोक माझेवर आरोप करतात की महारांना अधिक प्रमाणात मी मतदानाचा हक्क मिळवून दिला. कारण महार वतनदारांना मताचा अधिकार मिळाला. पण मी या गोष्टी केल्या हे म्हणणे साफ चुकीचे आहे. या गोष्टी प्रांतिक सरकारच्या मताप्रमाणे घडून आल्या आहेत. साधारण शेकडा किती टक्के लोकांना मतदानाचा हक्क द्यावयाचा हे सरकारने ठरविले व त्याप्रमाणे निरनिराळ्या प्रांतिक सरकारांनी निरनिराळ्या पद्धती सुचविल्या व त्या सरकारनी अंमलात आणल्या त्यात माझा दोष नाही. पण या बाबतीत मला एक महत्त्वाची गोष्ट सांगावयाची आहे. मुंबई प्रांतात वरिष्ठ व कनिष्ठ अशी दोन कायदे मंडळे आहेत. वरिष्ठ कायदे मंडळाचे मुंबई शहरातील मतदार जवळ जवळ ३५० आहेत. त्यापैकी सुमारे ३०० मतदार चांभार आहेत आणि ५० महार आहेत. म्हणजे महारांच्या निदान ६ पट मतदार चांभार आहेत. महारांची लोकसंख्या चांभारांच्या कितीतरी पटीने अधिक आहे. पण हा जो महारांवर अन्याय झाला याची जाणीव माझेवर स्वार्थाचा आरोप करणाऱ्या चांभार पुढाऱ्यांना का झाली नाही ? आम्हाला चांभाराना अधिक मतदार मिळाले म्हणून खंती वाटत नाही. पण खेद वाटतो तो सर्व चांभार समाजाने मनात आणले असते तर केवळ आपल्या मतांच्या जोरावर ते आपला एक प्रतिनिधी वरिष्ठ कायदे मंडळात निवडू शकले असते. पण ही साधी गोष्ट देखील ते करू शकले नाहीत. इतकेच नव्हे तर एक चांभार उमेदवार उभा राहिला होता त्याला विरोध करून काही चांभार पुढाऱ्यांनी दुसऱ्या उमेदवाराला मते जमविण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट

अस्पृश्यांच्या चळवळीत महार समाजाने प्रामुख्याने भाग घेतला व कष्ट सोसले ही गोष्ट निर्विवाद आहे. पण त्यामुळे त्यांनी सरकारी नोकऱ्या किंवा अधिकाराच्या जागा अधिक मिळविल्या असे काही झाले नाही. उलट चळवळे म्हणून सर्व जातीवर एक छाप बसला. मी पूर्वीच्या कायदे मंडळात असताना १९२७ सालापासून नाशिक येथील पोलीस ट्रेनिंग कॉलेजात अस्पृश्यांचा प्रवेश व्हावा म्हणून कसोटीचा प्रयत्न केला व त्यात थोडेबहुत यशही आले पण त्यात आतापर्यंत जे उमेदवार दाखल झाले त्यातून महार उमेदवारांना खड्यासारखे वगळण्यात आले. त्यांना अधिका-यांकडून प्रश्न विचारण्यात येतो की, तू किती विहिरी बाटविल्यास ? तेव्हा चळवळीमुळे झाला असेल तर महारांचा तोटाच झाला आहे पण मला त्याबद्दल वाईट वाटत नाही. महार चळवळ करतात ती सर्व अस्पृश्य वर्गांच्या हिताकरता करतात. त्या चळवळीत त्यांचा तादृष्य असा फायदा झाला नाही तरी तो समाज जागृत झाल्याशिवाय राहणार नाही व पुढे गेल्याशिवाय राहाणार नाही. मागे राहातील ते चळवळ न करणारे लोक राहतील. मी चांभार किंवा मांग यांना तुम्ही माझे मागे या असे बिलकूल सांगत नाही. ज्यांना यायचे असेल त्यांनी यावे. कोणी माझे बरोबर राहिला किंवा कोणी मला सोडून गेला तरी त्याबद्दल मला आनंद किंवा रोष वाटत नाही. माझ्या तत्त्वावर माझ्या कार्यक्रमावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि माझी खात्री आहे की जे लोक मला सोडून गेले ते देखील माझ्या कार्यक्रमामागे येतील. शिवतरकर मास्तर देखील येतील! ते मला सोडून गेले म्हणून मला त्यांचेबद्दल रोष वाटत नाही किंवा त्यांचेबद्दल मी कोणाजवळ वाईट बोलत नाही. ते मला शिव्या देतात हे मला माहित आहे. पण मी असे म्हणतो की शिवतरकर मास्तर माझे बरोबर १२ वर्षे काम करीत होते. एवढ्या दीर्घावधीत माझ्यातील जे दोष त्यांना दिसले नाहीत ते १३ व्या वर्षीच कसे दिसले ? १२ वर्षे मानवलेले माझे दोष त्यांच्या मते दोष तरी नसले पाहिजेत किंवा असलेच तर ते क्षम्य असले पाहिजेत. तेव्हा माझा मार्ग सरळ आहे व सर्वांना खुला आहे. .मी धर्मातराचे मत पसंत केले. त्यात आपल्यातील महार, मांग, चांभार इत्यादी जातीभेद नष्ट व्हावेत हा एक हेतू आहे. आपण धर्म बदलला तर निदान महार, मांग, चांभार ही नावे तरी आपणास चिकटणार नाहीत. आपण सर्व एक होऊ व उन्नतीच्या मार्गाला लागू, शेवटी तुम्हास मला इशारा द्यावयाचा आहे आणि तेच माझे महत्त्वाचे कर्तव्य आहे असे मी समजतो. कांग्रेस ही हिंदू लोकांची आहे. तिचे अग्रणी गांधी हे तुम्हाला फसवीत आहेत. हरिजन सेवक संघ हा तुम्हाला गुलाम करण्याचा कावा आहे. त्यापासून तुम्ही सावध रहा व डोळे उघडून वागा. इतके बोलून मी आपली रजा घेतो.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password