Categories

Most Viewed

20 जुलै 1952 भाषण

“शिक्षित मुले समाजाच्या उन्नतीप्रित्यर्थ काही करणार आहेत का ?”

डॉ. बाबासाहेब आबेडकर यांना दिनांक 20 जुलै 1952 रोजी महार समाज सेवा संघाने पुष्पहार अर्पण केला. तत्प्रसंगी संघाने इमारत फंडास 26 रुपये देणगी दिली व पुढील निवेदन केले.

कार्यकारी मंडळाने परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याच आशिर्वादाने सिद्धार्थ बोर्डींग संगमनेर व कर्जत येथे सध्या शिक्षण घेत असलेल्या 75 मुलांच्या दोन वसतिगृहाची माहिती सांगितली. पैकी कर्जत वसतिगृहास ग्रँट मिळवावयाची आहे. सदर वसतिगृह ग्रँटशिवाय चालविता येणे दुरापास्त आहे.

सिद्धार्थ बोर्डींग संगमनेर या संस्थेस थोडी फार सरकारी मदत मिळते. त्यामुळे त्या वसतिगृहासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचा विचार चालू आहे. आपण या इमारतीस आशिर्वाद दिल्यास आमचा उत्साह द्विगुणित होऊन हे अवघड काम संघ शिरावर घेऊन पार पाडू शकेल असे कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतर बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले,

तुम्ही हे सामाजिक कार्य करता त्याबद्दल मला समाधान वाटते. तुमच्या संगमनेर वसतिगृहाच्या इमारत फंडास मी शुभेच्छा प्रगट करतो. पण मला लोकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो तो हा की, तुम्ही या समाजाच्या मुलांना स्वतः खस्ता खाऊन शिक्षण देता, ती मुले शिक्षण संपादन केल्यानंतर तुमच्या समाजाच्या उन्नतीप्रित्यर्थ काही करणार आहेत का ? तुम्ही त्यांच्याकडून याबाबत काही प्रतिज्ञा लेख लिहून घेता काय ? (नाही. असे उत्तर मिळाल्यावर) पददलित समाजाची सेवा करण्यासाठी आपल्यातील काही मुले शिकून तयार व्हावीत म्हणून मी सिद्धार्थ कॉलेज काढले. पण अनुभव मात्र कटु येत आहे. शिक्षण संपादन केल्यानंतर एखादी मोठी नोकरी मिळाली की बस्स! झाले आपले काम ! मी कोण आहे ? मला शिक्षण कोणी दिले? कसे दिले ? त्यांनी किती कष्ट केले ? याची तिळमात्र जाणीव न ठेवता हे लोक आपल्या समाजाला विसरतात. या लोकांना काय म्हणावे हेच मला समजत नाही. तेव्हा तुम्ही हा खटाटोप करता तो फुकट आहे असे मला वाटते. नाहीतर त्यांच्यावर काहीतरी बंधनकारक राहील असे करा. कोणाची पोरे बोर्डिंगात आणायची ? त्यांना शिक्षण द्यायचे कोणी ? आणि इतके केल्यावर त्यांनी समाजाकडे ढुंकूनही पाहायचे नाही, हा कृतघ्नपणा नव्हे का ? माझे आयुष्य मी तुमच्या हितार्थ वेचतो आहे. पण माझ्या पश्चात या समाजाचे कसे होईल ? ही माझी चिंता दूर करणारी माणसे तुमच्यात अजून तयार होऊ नयेत ? या सर्व गोष्टींचा विचार केला की, मी माझे आयुष्य तुमच्यासाठी फुकट खर्ची घातले, असे वाटू लागते.

मुंबईत मी तुमच्यासाठी मोठा हॉल लवकरच बांधणार आहे, त्यासाठी मी त्या दिवशी दामोदर हॉलमध्ये निवेदन केल्याप्रमाणे तुम्ही किती पैसे जमविले आणि मी किती जमविले हे स्पष्ट केले. माझ्या नावावर तुमचा किती पैसा बँकेत आहे, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगून टाकले आहे. हेतू हा की, माझ्या पश्चात माझ्या मुलानेही त्यावर आपला हक्क सांगू नये व तुम्हालाही त्याची निश्चित कल्पना यावी. तरी सर्वांनी हा हॉल बांधण्यासाठी पराकाष्ठेने प्रयत्न करा. नगर जिल्हा नाशिक जिल्हा, नंतर संगमनेर तालुका, पुढे माझ्या गावापुरते मी पाहीन, ही उतरती दुरावस्था थांबविलीच पाहिजे.

सदर भाषण जनता वृत्तपत्रात दिनांक 26 जुलै 1952 रोजी प्रसिद्ध झाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password