Categories

Most Viewed

20 जुलै 1927 भाषण

“महार जातीवरील आप्पलपोटेपणाचा आरोप निराधार.”

बुधवार तारीख 20 जुलै 1927 रोजी सायंकाळी साडे सात वाजता पुणे येथील मांगवाडयात पुण्याच्या ” दीनबंधू ” पत्राचे संपादक डॉ. नवले यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य लोकांची जाहीर सभा भरली होती. त्यावेळी अस्पृश्य आणि स्पृश्य वर्गातील सुमारे 300 मंडळी हजर होती. मुंबई कायदेमंडळातील सरकार नियुक्त सभासद डॉ. आंबेडकर, बार-अँट लॉ व डॉ. साळुंखे, सुभेदार घाडगे, मि. राजभोज, मि. के. एम. जाधव, बी. ए. मि. पाताडे, मि. गायकवाड, मि. साळवेकर, मि. इंगळे, मि. लांडगे, मि. सावळेकर, मि. के. के. सकट, मि. घाडगे. मि. वायदंडे, वऱ्हाडातील आनंदस्वामी व मि. पंढरीनाथ पाटील, श्री. धुंडीराज पंत ठेंगडी, आर्यसेवक रा. ओघळे, रा. शंकरराव पोतनीस, रा. देशपांडे वगैरे मंडळी सभेत प्रामुख्याने दिसत होती. सभा असताना पावसाच्या लहान लहान सरी मधून मधून येत होत्या. परंतु डॉ. आंबेडकरांसारख्या अनुभवी पुढाऱ्यांचे भाषण ऐकण्यास मंडळी उत्सुक असल्या कारणाने पावसास न जुमानता सभेचे काम चालूच होते.

रा. के. एम. जाधव यांच्या सूचनेनुरूप डॉ. नवले यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. नंतर डॉ. बाबासाहेब आबेडकर हे आपल्या भाषणात म्हणाले,
मी आज मन मोकळे करून बोलणार आहे. माझ्या भाषणाचा कोणीही विपर्यास करू नये. मि. सकट आणि मि. वायदंडे यांनी सध्या माझ्यावर विनाकारण टीका सुरू केली आहे. पुढाऱ्यावर नेहमी टीका व्हायचीच हे मी जाणून आहे. मी महार जातीचा आहे. हे आपणास माहीतच आहे. महार जात स्वार्थी आहे हे टीकाकारांचे म्हणणे आहे. परंतु अस्पृश्य वर्गाच्या महारेतर जातीतील पुढाऱ्यांनी महारांकरीता निःस्वार्थीबुद्धीने काम केले आहे काय? असा माझा त्यांना उलट स्पष्ट सवाल आहे.

वास्तविक पाहता, महारेतर जातीच शैक्षणिक आणि सांपत्तिक दृष्ट्या श्रेष्ठ आहेत. मुंबईत तर चांभार व ढोर जातीतील काही गृहस्थ इन्कमटॅक्स देण्याइतके सघन आहेत. असे असताना त्यांनी महार लोकांच्या उन्नतीप्रित्यर्थ काही प्रयत्न केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. उलटपक्षी आम्ही अनेक उपयुक्त संस्था काढून नुसत्या महार जातीच्याच नव्हे तर अस्पृश्यातील सर्व जातींच्या उन्नतीकरिता काया-वाचा-मने झटत आहोत. बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन करून अस्पृश्योन्नतीचे काम आम्ही हाती घेतले आहे. सोलापूरात आम्ही अस्पृश्यांकरिता वसतिगृह काढले आहे. त्यास चांभारांनी मदत दिलेली नाही तरी पण महार-मांग, चांभार वगैरे सर्व जातीतील मुले त्या गृहात आम्ही घेतली आहेत. “आणखी माग विद्यार्थी त्या गृहात आपण जरूर पाठवा” अशी मी मि. सकट यांना समक्ष विनंती केली आहे. त्याचप्रमाणे नाशिक व जळगाव येथे वसतिगृहे काढून महार व महारेतर जातींच्या उन्नतीकरिता आम्ही सदोदीत झटत आहोत असे असताना महार जातीविरुद्ध गिल्ला करण्यात काय हशील आहे, हे आम्हास समजत नाही.

सरकारकडून मिळणाऱ्या सवलती अस्पृश्य जातीत योग्य प्रमाणात वाटल्या न जाता फक्त महार जात आप्पलपोटेपणा करून सर्व सवलती बळकावून बसते असे टीकाकारांचे म्हणणे आहे. मुंबईत मि. निकाळजे नावाच्या महार जातीतील गृहस्थास मुंबई कॉर्पोरेशनमध्ये नॉमिनेट केले होते. पण अखिल अस्पृश्य वर्गाची त्यांच्या हातून उन्नती व्हावी तशी होत नाही. ही गोष्ट माझ्या लक्षात आली तेव्हा त्यांची जागा चांभार जातीतील सुप्रसिद्ध क्रिकेटपटू मि. बाळू यांना मीच सरकारकडून देवविली. सातारा शहरात महार लोकांची पुष्कळ वस्ती असूनसुद्धा येथील म्युनिसीपालिटीत सरकार नियुक्त सभासद चांभार जातीतीलच आहे. ह्या सर्व गोष्टी ध्यानात घेतल्या असता महार जातीवरील आप्पलपोटेपणाचा आरोप किती फोल आहे. हे दिसून येण्यासारखे आहे.

काही अज्ञानी महार लोक व्यापक दृष्टीचे नसतील. पण येवढ्याच कारणावरून अखिल महार जातीस दूषण लावणे चांगले नाही. महार जातीतील पुढारी काय करतात हे अवलोकन करा आणि नंतर दूषणे देण्यास पुढे या असे माझे इतर जातीतील लोकांना आग्रहाचे सांगणे आहे.. मी स्वतः मांग जातीशी रोटी-बेटी व्यवहार करावयास तयार आहे. अशी स्थिती असताना महार-मांगांना तेढ का असावी हे समजत नाही. मी स्वतः माझ्या घरी मांगाचा एक मुलगा पोटच्या पोराप्रमाणे पाळला होता. अजून कोणी मला जर एखाद्या मांगाचा मुलगा आणून देईल तर मी त्याचे पालनपोषण करीन. आम्ही नुसते बोलके पुढारी नसून प्रत्येक गोष्ट कृतीत करून दाखवितो. काँग्रेसच्या अधिवेशनात जेवणाच्या वेळी जातीनिहाय निरनिराळे तट असतात. परंतु माझ्या नेतृत्वाखाली भरलेल्या बहिष्कृत परिषदेच्या वेळी सर्व जातीचे भोजन एकाच ठिकाणी झाले हथावरून जाती जातीत ऐक्यभाव उत्पन्न करण्याचे आम्ही किती प्रयत्न करीत आहोत यासंबंधीची चांगलीच कल्पना येईल.

इतकेही असून जर महारेतर जातींना महारांपासून निराळे राहण्याची इच्छा असेल तर त्यांनी खुशाल तसे करावे. त्यांनी स्वतंत्र राहून अस्पृश्योद्धाराचे काम केले तरी आमची ना नाही, पण त्यांनी विशिष्ट लोकांच्या छत्राखाली मात्र राहू नये अशी माझी विनंती आहे. काही ब्राह्मण अस्पृश्योद्धाराकरिता झटतात. ही गोष्ट जरी खरी असली तरी पुष्कळसे ब्राह्मण-ब्राह्मणेतर पक्षापेक्षा आपला पक्ष बलवान करण्याकरिताच अस्पृश्यांना जवळ करतात असे मला वाटते. आमच्या उद्धाराकरिताच केवळ निःस्वार्थ बुद्धीने जो ब्राह्मण अथवा मराठा प्रयत्न करील तसा आम्हास हवा आहे. आम्हास दुस-यांच्या हातातील कोलीत होण्याची इच्छा नाही.

स्वार्थी बुद्धीने प्रेरित झालेल्या लोकांकडून अस्पृश्यता निवारण कार्य झाले तरी एक वेळ चिंता नाही, कारण अस्पृश्य राहून मिळणाऱ्या सवलतीच्या सहाय्याने आमची उन्नती करून घेणेच आम्हास सुलभ होईल असे मला वाटते. अस्पृश्यतानिवारण करण्याचा रा. माटे यांचा खरोखरी उद्देश नाही असे मला वाटते. अस्पृश्यांना जवळ करून ब्राह्मणेतरांना शह देण्याची त्यांची खटपट आहे. अशी माझी समजूत आहे. रा. माटे यांनी माझी समजूत चुकीची आहे. असे सप्रमाण सिद्ध केल्यास मी त्यांशी अवश्य सहकार्य करीन.

मुसलमानापासून बचाव व्हावा म्हणून अस्पृश्यतानिवारण करण्याचा डाव सध्या हिंदू सभा खेळत आहे असे मला वाटते. अशा स्थितीत महारेतर बंधूंना माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी कोणाच्याही कच्छपी लागू नये. मि. सकट यांनी ‘दे दान सुटे गिराण ” असे ओरडून भीक मागितली तरी मला वाईट वाटणार नाही. पण ते जर रा माटे यांच्या नादी लागतील तर मला अत्यंत खेद होईल. निराळे रहा. पण दुसऱ्यांचे बगलबच्चे होऊ नका एवढेच माझे त्यांना सांगणे आहे.

महार जातीचे पुढारीच कौन्सिलमधील जागा बळकावून बसतात असा आमच्यावर आक्षेप आहे. अस्पृश्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याकरिता कौन्सिलात लायक माणसेच जाणे इष्ट नाही काय? महारेतरात माझ्यासारखा माणूस जन्माला आलेला नाही हे त्यांचे दुर्दैव होय. परंतु मला कौन्सिलच्या जागेची अभिलाषा नाही. महारेतरात जर जास्त लायक माणूस असेल तर त्याने खुशाल माझी जागा घ्यावी. मी आताच्या आता येथूनच राजीनामा पाठविण्यास तयार आहे. मी कौन्सिलमध्ये जेव्हा जेव्हा फक्त महार जातीच्या हिताकरताच झटतो आहे असा तुम्हास संशय येईल तेव्हा तुम्ही मला पत्राद्वारा आपल्या शंका जरूर कळवा म्हणजे मी सर्वांच्या शंकांचे ताबडतोब निरसन करीन.

सुशिक्षित व्हा म्हणजे अस्पृश्यता आपोआप जाईल असे स्पृश्य वर्गातील लोक आपणास सांगतात; पण नुसते सुशिक्षित होण्याने अस्पृश्यता निवारण होईल असे मानणे सर्वथैव चुकीचे आहे. मी एक उदाहरण देतो म्हणजे कळेल. मी अस्पृश्य आहे हे जोपर्यंत मुंबईच्या माझ्या चेंबर नजिक असणाऱ्या भटाला, खानावळ वाल्याला माहीत नव्हते तोपर्यंत तो मला त्याच्या कपबशीतून चहा आणि भजी पुरवीत असे; पण परवा मी अस्पृश्य आहे, हे जेव्हा त्याला एका गुजराती वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या फोटोवरून कळले तेव्हापासून तो मला काचेच्या पेल्यातून चहा देऊ लागला. त्याला असे करण्यास अर्थात एका स्पृश्य वर्गातील कारकुनाने चिथावले होते. अशी स्थिती जेथे आहे तेथे सुशिक्षित झाल्यावर अस्पृश्यता आपोआप निघून जाईल असे म्हणणे कसे चुकीचे आहे हे दिसून येईल.

जर आम्ही आता चढाईचे धोरण स्वीकारले नाही तर आमचा निभाव लागणे शक्य नाही. आम्ही तुडविले जात आहोत याचे कारण आपणास आपल्या अपमानाचा राग येत नाही हेच होय. अन्यायाचा प्रतिकार आमच्या पूर्वजांनी केला नाही. ही त्यांची मोठी चूक होय, आता अपमान सहन करण्याचे दिवस संपले हे आपण आपणात संघटना करून लोकांच्या नजरेत आणले पाहिजे.

यापुढे ज्या ज्या अस्पृश्यांच्या परिषदा भरविण्यात येतील त्याचे पर्यवसान देवळातून प्रवेश करणे, सार्वजनिक तळ्यात पाणी पिणे वगैरे गोष्टीमध्येच झाले पाहिजे असे माझे मत आहे. अस्पृश्यांची सभा आम्ही यंदा आळंदीस भरवणार आहोत. त्यावेळी काही झाले तरी तेथील देवालयात आम्ही प्रवेश करणारच. असे केले तरच आमचा कार्यभाग तडीस जाईल.

डॉ. आंबेडकर यांचे वरील आशयाचे भाषण झाल्यावर डॉ. साळुंखे यांनी थोडे भाषण करून गुजरातेतील अस्पृश्यांची महाराष्ट्रातील अस्पृश्यांच्या चळवळीस पूर्ण सहानुभूती आहे अशी ग्वाही दिली. नंतर वऱ्हाडातील रा. पंढरीनाथ पाटील यांचे भाषण चालू असताना मांगवाडयात कोणी एक आजारी इसम मयत झाल्याकारणाने त्याच्या निधनानिमित्त सभेचे काम बंद ठेवण्यात आले.

सदर भाषण बहिष्कृत भारत वृत्तपत्रात दिनांक 29 जुलै 1927 रोजी प्रसिद्ध झाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password