Categories

Most Viewed

13 जुलै 1940 भाषण

“स्वतंत्र मजूर पक्षाच्या आश्रयाने चालणाऱ्या वृक्षाचे छापखाना व ‘जनता’ पत्र हे मूळ आहे.”

शनिवार तारीख 13 जुलै 1940 रोजी रात्री 9 वाजता परळ येथे आर. एम. भट हायस्कूलच्या हॉलमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाच्या मुंबई शाखेच्या कार्यकारी मंडळाची बैठक भरली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले होते. ही बैठक ठाणे बोर्डिंग, ‘जनता’ पत्र व भारत भूषण छापखाना या तीन संस्थांना सध्या प्राप्त झालेल्या बिकट स्थितीचा विचार करून तिच्यातून मार्ग काढण्याच्या हेतूने मुद्दाम भरविण्यात आली होती. श्री. बाबूराव भातणकर, एम. एल. ए. यांनी सभासदांना ठाणे बोर्डिंगच्या परिस्थितीसंबंधी माहिती सांगून बोर्डिंगला मदत करण्याची विनंती केली. श्री. अनंतराव चित्रे यांनी ‘जनता’ व भारत भूषण छापखाना याचेसंबंधी माहिती दिली. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लहानसे भाषण केले. ते म्हणाले.

श्री. बाबुराव भातणकर हे स्वतः जर ठाणे बोर्डिंगची जबाबदारी आपल्या शिरावर घेण्याला तयार असतील तर माझी हरकत नाही. त्याचप्रमाणे श्री. अनंतराव चित्रे यांना छापखाना नुकसान न येता चालू शकेल, असे वाटत असेल तर आणखी काही दिवस अनुभव घेण्याला माझी तयारी आहे. मात्र बोर्डिंग आणि छापखाना याची जबाबदारी व्यक्तिशः मी माझेवर घेण्याला तयार नाही. मला शक्य होते तोवर ती जबाबदारी सांभाळली. पंचवीस हजार रुपये किंमतीचा छापखाना मी तुम्हाला काढून दिला आहे. कायदेमंडळे, म्युनिसीपालिट्या, लोकल बोर्ड वगैरेच्या निवडणुका, मुंबई म्युनिसीपल कामगार संघ वगैरे संस्था ज्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या आश्रयाने चालतात त्या वृक्षाचे छापखाना व जनता पत्र हे मूळ आहे, हे अजून आपल्यातल्या कित्येक लोकांना समजत नाही. छापखान्याचा ट्रस्ट करण्याची माझी तयारी आहे. पण आता नवीन कार्यकर्ते पुढे आले पाहिजेत. आतापर्यंतच्या कार्यकर्त्यांनी बिनामोबदला तुमचे कार्य केलेले आहे. आम्ही आता म्हातारे झालो आहोत. माझी पन्नाशी जवळ आली आहे. यापुढे तुमच्यापैकी नवीन उत्साही लोकांनी काम करण्याला पुढे सरसावले पाहिजे. माझ्याकडून शक्य ती सर्व मदत तुम्हाला देण्याला मी केव्हाही तयार आहे.

सदर भाषण जनता वृत्तपत्रात दिनांक 20 जुलै 1940 रोजी प्रसिद्ध झाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password