Categories

Most Viewed

10 सप्टेंबर 1932 भाषण

10 सप्टेंबर 1932 भाषण

“अस्पृश्य समाजास शिक्षण प्रसाराची निकड.”

शनिवार तारीख 10 सप्टेंबर 1932 रोजी महार बालवीर संस्थेमार्फत मुंबई येथील दामोदर हॉलमध्ये सभा झाली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. त्याचा गोषवारा :-

दामोदर हॉल आबालवृद्ध स्त्री-पुरुषांनी फुलून गेला होता. आत प्रवेश न मिळाल्यामुळे शेकडो लोक उत्सुकतेने बाबासाहेबांचे अमूल्य बोल कानी पडावे म्हणून धडपड करीत होते. आमच्या बातमीदारास सभेस यावयास थोडा उशीर झाल्यामुळे मोठ्या मुश्किलीने आत जाता आले. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात बाबासाहेब बोलावयास राहिले. परंतु हाच प्रचंड ध्वनी त्यांच्या मुखातून शब्दध्वनी उमटताच निमिषार्धात स्तब्ध झाला व सभा निश्चल होऊन बाबासाहेबांचे बोल श्रवण करू लागली.

प्रारंभी मंडळाच्या बहुविध कार्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांच्या शैक्षणिक कामगिरीची त्यांनी विशेष प्रशंसा केली. मंडळाने सादर केलेल्या हिशोबाच्या तक्त्यासंबंधी बोलताना त्यांनी सांगितले की, मंडळाने माझ्या स्वतःच्या गौरवाकरिता पुष्पहार निमित्त जी रक्कम खर्ची घातली आहे ती अधिक उपयुक्त कामाकडे खर्च करावयास पाहिजे होती. व त्या खर्चाचे ओझे मंडळाच्या आर्थिक शक्तीकडे पाहिले असता असहनीय आहे. म्हणून माझे ते ओझे मंडळावर पडू नये व त्यास कार्यविस्तार करण्यास मदत व्हावी यासाठी त्यांनी याप्रसंगी मंडळास अल्पशी मदत म्हणून 25 रुपयांची देणगी जाहीर केली. ते पुढे म्हणाले की,

आज अस्पृश्य समाजास अत्यंत निकडीचे असे कोणते कार्य असेल तर ते शिक्षण प्रसार होय. समाजातील प्रत्येक व्यक्तीने तसेच हरएक संस्थेने शिक्षणाच्या बाबतीत आपल्या तरुण पिढीचे पाऊल पुढे कसे पडेल हया प्रश्नाकडे लक्ष पुरविले पाहिजे व त्या अनुरोधाने आपल्या कार्याची दिशा ठरविली पाहिजे.

आपण स्वतः देखील हेच कार्य अंगिकारले असून त्यादृष्टीने कार्य चालू ठेविले आहे आणि ह्याचे प्रत्यंतर म्हणजे सध्या अस्तित्वात असलेले तीन बोर्डिंगे. महाराष्ट्रातील मुलांकरिता ठाणे बोर्डिंग, कर्नाटकातील शिशुवर्गाकरिता धारवाड येथील बोर्डींग व गुजरातमधील बालकांकरिता अहमदाबाद येथे स्थापलेले होस्टेल ही ती बोर्डिंगे तीन बोर्डींग होत. या तिन्ही ठिकाणी मिळून आज जवळ जवळ 100 मुलांची सोय झाली आहे.

पुढे बाबासाहेबांनी जमलेल्या मंडळीस नीट पटावे म्हणून आजच्या परिस्थितीचे एक शब्दचित्र रेखाटले. त्यांनी सांगितले की, या देशातील उच्चनीचता दृढमूल होण्यास समाजातील जातीव्यवस्था हे तर कारण आहेच पण तीस चिरस्थायित्व जातीतील गुणवैशिष्ट्यामुळे आले आहे. काही ठराविक जातीचे श्रेष्ठत्व इतर जातीतील ज्ञानाभावामुळे कायम राहिले. सरकार दरबारातील मोठमोठ्या नोक-या, मामलतदारी किंवा पोलीस अधिकारी वगैरेसारख्या लोकांवर सत्ता गाजविणाऱ्या जागा या सर्वांत अस्पृश्य समाजास अद्यापपावेतो संपूर्ण मज्जाव असे. यामुळे प्रत्यक्ष व्यवहारात या समाजाची अवहेलना तर होतेच पण या समाजाकडे इतर जातींचा पाहण्याचा दृष्टिकोनही अगदी भिन्न प्रकारचा असतो. हा आकुंचित दृष्टिकोन बदलून आपल्या समाजाबाबत इतरांच्या मनात वावरत असलेली असमानतेची भावना नष्ट करावयाची असेल तर त्यास रामबाण उपाय म्हटला म्हणजे या अंमलदारीच्या जागा संपादन करणे हा होय.

प्रत्यक्ष उदाहरण द्यावयाचे म्हणजे आज डेप्युटी कलेक्टरचे काम करीत असलेल्या एका अस्पृश्य तरुणाचे होय. ते ज्या ज्या जिल्ह्यात जातात तेथील अस्पृश्य समाजास आपल्यावर खरेखुरे कृपाछत्र आहे असे तर वाटतेच पण शिवाय अस्पृश्यांना तुच्छतेने लेखण्याची जी इतर समाजाची भावना ती कमी व्हावयास लागते. असे अनेक अधिकारी झाल्यास आजची परिस्थिती पालटल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपण ही गोष्ट कधीही विसरता कामा नये की, जर आताच सांगितलेल्या गृहस्थाने उच्च शिक्षण संपादन करून आपली लायकी प्रस्थापित केली नसती तर हा थोडासा फरक देखील आपल्याला लाभला नसता. हाडाची काडे करून त्यांनी शिक्षण संपादन केले नसते तर ही परिस्थिती प्राप्त झाली असती काय ? तेव्हा आपला व्यक्तीविषयक लौकिक वाढविणे व त्याबरोबरच आपल्या समाजाची योग्यता वाढविणे हे केवळ शिक्षणावर अवलंबून आहे. आज कायद्याने जरी आपण आपल्या समाजाकरिता सरकारी नोकरीत आपले प्रमाण ठरवून घेतले तरी योग्य ते शिक्षण घेऊन अंगी लायकी प्राप्त करून घेतल्याशिवाय आपल्या मागण्या निष्फळ होतील. यात आपले माप आपल्याच दौर्बल्यामुळे पुरेपुर पदरात पडणार नाही.

गोलमेज परिषदेपुढे अन्य कोणत्याही ठिकाणी म्हणा प्रत्येक प्रसंगी मला अस्पृश्य समाजाकरिता कायदे कौन्सिलात राखीव जागा मागताना नेहमी हाच मोठा प्रश्न पडत असे. पण अस्पृश्याच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा व दिवसेंदिवस वृद्धिंगत होणारी ज्ञानलालसा ह्यावर माझा पूर्ण विश्वास असल्यामुळे मला धीर येत असे. गेल्या काळाशी तुलना केली असता आज अस्पृश्य समाजास उपलब्ध असलेली ज्ञानार्जनाची साधने व परिस्थितीत पडलेला फरक ही पाहिली असता आपल्याला एक प्रकारची उमेद येते असे त्यांनी सांगितले.

याचवेळी आपल्या स्वतःच्या आयुष्यातील मनोरंजक पण बोधप्रद असा एक अनुभव त्यांनी निवेदन केला. आपण जेव्हा इंग्रजीचा अभ्यास करण्यास मुंबईत आलो. त्यावेळची आपली परिस्थिती त्यांनी कथन केली. 8 फूट रूंदीची व 10 फूट लांबीची मुंबईतील गलिच्छ वस्तीतील आपली जागा, त्यात वास्तव्य करणारी 8-10 जिवंत माणसे, खोलीच्या एका बाजूला मोरी, जवळच चूल व कोप-यात व डोकीवरील माळ्यावर रचलेली लाकडे, धुराच्या कडेलोटात इतक्या माणसांचा अनेक तऱ्हेचा व्यवसाय, विद्यार्थ्यांच्या व्यासंगप्रिय संगतीचा अभाव, अशा कष्टमय परिस्थितीत अभ्यासक्रम आटोपून निरनिराळ्या परीक्षा कशा द्याव्या लागल्या याचे बाबासाहेबांनी हृदयंगम वर्णन केले. आजच्या विद्यार्थी वर्गास नाना प्रकारच्या शिष्यवृत्त्या, राहण्यास वसतीगृहे व विद्यार्थ्यांचा सहवास लाभत असल्यामुळे त्यांचा अभ्यासक्रम अधिक सुकर झाला आहे. तेव्हा या संधीचा व साधनांचा पूर्ण उपयोग करून घेऊन समाजाची योग्यता वाढविणे हे प्रत्येक तरुणाचे कर्तव्य आहे.

शेवटी त्यांनी विद्यार्थ्यास अत्यंत कळकळीचा असा उपदेश केला. विद्यार्थी दशेत ज्ञानार्जन चालू असता त्यांनी आपल्यापुढे निरंतर – ज्ञानार्जन” हे एकच ध्येय ठेवावे. विद्यार्थीदशा परत प्राप्त होणार नाही. ह्या अवधीत प्रयत्नांची परमावधी करून ज्ञान संपादन करावे. समाजसेवेत पुढील आयुष्यात विपुल काळ आहे. विद्यार्थीदशेत व्याख्यान देऊन समाजाचे होणारे तात्कालिक हित हे पूर्ण ज्ञान संपादन झाल्यानंतर जी अनेक प्रकारे अधिकार प्राप्तीने सेवा करिता येऊन समाजाचे जे हित साधता येईल त्या हितापेक्षा शतपटीने हिणकस आहे. या तत्त्वाची पूर्ण जाणीव ठेवून शिक्षण प्राप्ती हेच आपले सध्याचे ध्येय ठेवावे असे त्यांनी विद्यार्थ्यास मोठ्या कळकळीने सांगितले. नंतर मंडळाने आपल्याला आज जी सुसंधी प्राप्त करून दिली त्याबद्दल त्यांनी मंडळाचे आभार मानले व मंडळाच्या कामात यश चिंतून आपले भाषण संपविले.

नंतर रा. डी. व्ही. प्रधान यांचे भाषण झाले. त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाबद्दल आनंद व्यक्त करून लोकशिक्षणाचे काम वर्तमानपत्रे कशी करतात ते विशद करून व अस्पृश्य समाजाचे मुखपत्र म्हणून आज काम करीत असलेले जनता-पत्र सर्व अस्पृश्य जनतेने कसे मनोभावाने वाचले पाहिजे हे सांगून त्याचा प्रसार म्हणजेच लोक शिक्षणाचा प्रसार होय, असे बजाविले व याकरिता ‘जनते’ च्या वर्गणीदारांची संख्या वाढणे किती अवश्य आहे हे सांगितले. मंडळाच्या चिटणीसांनी नंतर बाबासाहेबांचे, इतर निमंत्रित पाहुणे मंडळीचे व जमलेल्या इतर सर्व मंडळीचे मंडळातर्फे आभार मानले व बालिकांच्या सुस्वर गायनात बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करण्यात आला व नंतर सभा बरखास्त झाली.

सदर भाषण जनता वृत्तपत्रात दिनांक 17 सप्टेंबर 1932 रोजी प्रसिद्ध झाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password