Categories

Most Viewed

07 सप्टेंबर 1936 भाषण

“आपणाला यावेळी मोठा समुद्र ओलांडून जायचे आहे.”

तारीख 7 सप्टेंबर 1936 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर काही कामानिमित्त पुण्यास सकाळच्या एक्स्प्रेसने गेले होते. ही एक्स्प्रेस गाडी दुपारी बारा वाजता पुण्यास आली. त्यावेळी स्टेशनवर त्यांचे अस्पृश्य पुढारी मंडळीकडून स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या स्वागतार्थ मे. सुभेदार आर. एस. घाटगे, राजाराम भोळे, डी. जी. जाधव, आर. के. कदम, सुभेदार, दुबे, सावंत, मातंग समाजाचे श्री. लांडगे वगैरे मंडळी हजर होती. मातंग समाजातर्फे फोटो व पुष्पहार अर्पण समारंभ झाल्यावर डॉ. बाबासाहेब आपल्या खाजगी कामाकरिता गेले. नंतर त्यांना दीड वाजण्याच्या सुमारास डी. सी. मिशनमध्ये आणण्यात आले. त्यांच्याबरोबर डॉ. सोळंकी साहेब हेही होते. डी. सी. मिशनमध्ये आगामी असेंब्लीच्या निवडणुकीसाठी विचारविनिमय करण्यासाठी पुण्यातील शंभर दिडशे पुढारी व इतर मंडळी जमली होती. सर्वाशी यासंबंधी चर्चा झाल्यानंतर डॉ. आंबेडकर साहेबांनी अस्पृश्यांकरिता ज्या राखीव जागातील उमेदवारांची जो नावे स्वतंत्र मजूर पक्षातर्फे जाहीर केली आहेत त्याविषयी आगामी निवडणुकीचे पहिले भाषण केले. ते म्हणाले,

प्रिय बांधवहो,
मी निवडलेल्या उमेदवारांबद्दल जी काही थोडीशी टीका केली जात असेल त्याबद्दल मला मुळीच खत वाटत नाही किंवा आश्चर्य वाटत नाही. कारण त्या मानाने प्रतिकूल असे मत फारसे दृष्टोत्पत्तीस येत नाही. यावरून माझी उमेदवार संबंधीची निवड समाजास पसंत पडली आहे. असे म्हणावयास मुळीच हरकत नाही. मी ज्या माणसांची निवड केली त्यात कोणी माझे नातेवाईक, चुलते, मुलगे, जावई किंवा व्याही वगैरे कोणी नाहीत. मी त्यांचा सर्वप्रकारचा विचार करून, तीन गोष्टींची कसोटी लावून त्यात जे कसोटीस उतरले त्यांचीच निवड केली आहे. पहिली कसोटी म्हणजे इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान. कारण तेथे सर्व कामकाज इंग्रजीतूनच चालणार आहे. आपापल्या जिल्ह्यातर्फे तालुक्यातले जाच त्रासादी गा-हाण्याचे प्रश्न असेंब्लीमध्ये इंग्रजीतून विचारता आले पाहिजेत म्हणून उमेदवार इंग्रजी जाणणारा पाहिजे. दुसरी गोष्ट म्हटली म्हणजे उमेदवार वयाने तरूण असला पाहिजे. म्हाताऱ्या मंडळींना काही तेथे पालखीतून बसवून न्यावयाचे नाही. एखाद्या असेंब्लीच्या सभासदाला असेंब्लीचे कामकाज चालू असताना एखाद्या खेड्यातून निकडीची तार आली तर त्याला तेथे वेळ पडल्यास पायी चालत जाता आले पाहिजे. रात्री बेरात्री आपल्या जिल्ह्यातील लोकांसाठी फिरता आले पाहिजे. ते कार्य एखाद्या म्हाता-या, संधीवाताने जखडलेल्या कौन्सिलरच्या हातून कदापीही होणार नाही, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे, आपल्या पक्षाचा उमेदवार पक्षाच्या शिस्तीखाली राहिला पाहिजे. पक्षाच्या नियमानुसार वागून त्याच्या अंगात कार्य करण्याची धमक पाहिजे. तो पक्षाकरिता निस्वार्थबुद्धीने काम करणारा पाहिजे. स्वार्थी माणसाला मी कवडीचीही किंमत द्यायला तयार नाही.

तुमच्या जिल्ह्यातर्फे निवडलेले श्री. राजाराम भोळे यांचे उदाहरण घ्या. त्यांच्यापेक्षा कोणताही जास्त शिकलेला व तितका लायक मनुष्य पुण्यात नाही. मला भाऊबंदकीकडे किंवा जिल्ह्याच्या दुराभिमानाकडे अथवा वतनदारीकडे लक्ष द्यावयाचे नाही. नुसत्या नावावर लायकी किंवा महत्त्व अवलंबून नाही. तर ते कामावर अवलंबून आहे. श्री. भोळे जर बिनविरोध निवडून आले तर आपल्या पदरात एकंदर तीन जागा पडतील. त्यांना जर विरोध नसला तर ते सहज निवडून येतील व त्यांना न दिल्या गेलेल्या मतांनी आपल्या पक्षाचा दुसरा उमेदवार निवडून येईल. दुसऱ्या भागात देखील आपल्या पक्षाचा उमेदवार आपल्या दुसऱ्या भागातील मतांनी सर्वसाधारण निवडणुकीत निवडून येईल. अशा तन्हेने आपण शिस्तीने वागलो तर आपणास एकट्या पुण्यात तीन जागा मिळविता येतील. तेव्हा आपण तालुक्याचा गावचा किंवा जिल्ह्याचा दुराभिमान सोडून तुम्ही आपल्या पक्षाच्या हिताकरिता लायक माणसालाच निवडून दिले पाहिजे. कौन्सिले म्हणजे म्हारकी नव्हे की, बाप मेला म्हणजे ती मुलाला मिळेल ।

सध्या माझी प्रकृती ठीक नाही. ब्लडप्रेशर झाले असल्यामुळे, थोडे अंतर देखील चालून जाता येत नाही, तेव्हा प्रत्येक ठिकाणी जाऊन मला शंकाकुशंका सोडवावयास वेळ सापडणार नाही. माझ्या कसोटीस उतरलेल्या उमेदवारांच्या विरुद्ध जर कोणास काही करावयाचे असल्यास ते त्यांनी नीट विचार करून आणि जबाबदारी ओळखून करण्याचे धाडस करावे. मी त्यांच्या स्वार्थी कृतीची चूक करून दाखवीन. दिवसेंदिवस माझ्या शिरावर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या येऊन पडत आहेत. आपल्या समाजाच्या स्वातंत्र्याच्या कार्यात मला हितशत्रू उत्पन्न झालेले आहेत. या आजच्या लढ्यात माझ्यावर कोणते प्राणांतिक प्रसंग उत्पन्न होतील ते मलाच सांगता येत नाहीत. अशाही बिकट परिस्थितीत मी तुम्हा बद्दलची सर्वप्रकारची जबाबदारी घ्यावयास तयार आहे. माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही मी निवडलेल्या लायक माणसालाच आपली मते देऊन निवडून आणून समाजाचे हित साधावे. सगळ्याच ठिकाणी म्हाता-यांना जर हक्क आहे तर सगळी म्हाता-यांचीच भरती होईल. मला स्वतःलाही कोठेच जागा राहणार नाही. माझ्यापेक्षा सुभेदार घाटग्यांनी 50 वर्षे जास्त काम केले आहे. श्री. शिवराम जानबा कांबळ्यांनी 60 वर्षे जास्त काम केले आहे. त्यांच्या वयाच्या मानाने मला देखील काम करता येणार नाही. तेव्हा या असल्या वादविवादात मला पडण्याचे काहीच कारण नाही. जोपर्यंत तुमचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी तुमचे पुढारीपण स्वीकारीन. आपणाला यावेळी मोठा समुद्र ओलांडून जावयाचे आहे. तेव्हा मी म्हणेन तेच नावाडी व चांगली नाव मला मिळाली पाहिजे. तरच मी नावेत पाय टाकीन. मोडकी नाव व कुचकामाचे नावाडी दिलेत तर मी नावेत मुळीच पाय ठेवणार नाही. मलाही तुमचा पुढारीपणा नको आहे. यासाठी तुम्ही सर्वांनी पूर्णपणे ध्यानात ठेवा की प्रत्येकाला लायकी पाहिजे. ‘नामसे नहीं कामसे है’ ही गोष्ट लक्षात ठेवा.

सदर भाषण जनता वृत्तपत्रात दिनांक 12 सप्टेंबर 1936 रोजी प्रसिद्ध झाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password