Categories

Most Viewed

04 ऑक्टोबर 1945 भाषण

04 ऑक्टोबर 1945 भाषण

“आपल्या प्रगतीसाठी देशाला मिळणाऱ्या सत्तेमध्ये आपण भागीदार झालेच पाहिजे”

संध्याकाळी अहिल्याश्रमाच्या पटांगणात रा. ब. एन. शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रचंड जाहीर सभा घेण्यात आली. सदर सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर खास भाषण करणार असल्याचे हस्तपत्रिकाद्वारे गेल्या जनता पत्राच्या अंकात जाहीर झाले असल्यामुळे सभेस प्रचंड जनसमदाय जमा झाला होता. या सभेत येत्या निवडणुकी व अस्पृश्य समाजाचे भवितव्य याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत तेजस्वी असे भाषण झाले. लोकसमुदाय 50 हजारपर्यंत होता. ‘आंबेडकर झिंदाबाद’ च्या गगनभेदी घोषणानी सर्व वातावरण निनादून गेले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले.
भगिनीनो आणि बंधुजनहो,
आज ही सभा भरविण्यात आली आहे तिचा मुख्य उद्देश आगामी निवडणुकांचा प्रचार आहे. आज मला अस्पृश्य समाजाला वेळीच सूचना, चेतावणी द्यावयाची आहे. आता जी भाषणे झाली ती फार महत्त्वपूर्ण होती. ही भाषणे ज्यांनी केली ते कदाचित उमेदवार असू शकतील म्हणून त्यांनी ती मोठ्या आवेशाने केली. पण मी काही उमेदवार नाही. (हंशा) मला इलेक्शनला उभे राहाण्याची इच्छा नाही, म्हणून माझ्या भाषणात आपणास आवेश आढळणार नाही. मी जरी आज कमान्डर-इन-चीफ नसलो तरी अस्पृश्य समाजाचे पुढारीपण माझ्याकडे अंशतः तरी आहे. म्हणून माझ्या अनुयांयाच्या ब-यासाठी मी माझ्या अनुभवावरून सल्ला देण्यासाठी उभा आहे.

ही जी निवडणूक आहे, तिच्याकडे पाहून मला एका गोष्टीची आठवण होते. तुकारामाने म्हटले आहे की, “आली सिंहस्थ पर्वणी, न्हाव्या, भटा झाली मेजवाणी” ही निवडणूक सिंहस्थ पर्वणी आहे. इतर पक्षांना ही एक मेजवानी वाटते. पण ही म्हण अस्पृश्य समाजास मात्र मुळीच लागू नाही,

असा समज होता की, राजकारण फक्त ब्राह्मणालाच येते. हा फक्त भटांचा मक्ता होता आणि हे थोडेसे खरे देखील होते. राजकारण खेळणे कारण लोकल बोर्ड्स, म्युनिसीपालट्या, कायदेमंडळे यात फक्त ब्राह्मण सभासद होते. परंतु आता मी म्हणू शकेन की, या देशात राजकारण फक्त अस्पृश्य आणि ब्राह्मण यांनाच कळते. फक्त दहा वर्षात हा फरक झाला आहे. 1892 पासून लोकनियुक्त पद्धती सुरू झाली. हळूहळू हिंदू मुसलमान आणि खिश्चन यांना त्यात आपापल्या परीने भाग घेता येऊ लागला. आश्चर्य हे की, 1935 पर्यंत अस्पृश्य समाजास मतदानाचा हक्क नव्हता. अर्थात 1935 पर्यंत मतदान, उमेदवार व निवडणूक याबद्दल त्याला काही माहीत नव्हते. 1937 च्या निवडणुकीत अस्पृश्य समाजाने मुंबई असेंब्लीतील 15 पैकी 15 जागा जिंकल्या. काँग्रेसने आपल्या दोन जागा जिंकल्या. आपण देखील काँग्रेसच्या उमेदवारांना सपशेल चीत करून त्यांच्या दोन जागा जिंकल्या. एकूण हिशेब बरोबर झाला. हिशोबाच्या वहीत काँग्रेसला मिळविणीच्या बाजूस श्रीशून्य जमा लिहावे लागले. ज्या समाजाला राजकारण औषधाला माहीत नव्हते, तो समाज 1937 च्या निवडणुकीच्या पहिल्याच सलामीत संपूर्ण विजयी झाला. ही काही साधी गोष्ट नाही. या समाजाला राजकारण शिकविण्याची काही जरूरी नाही. कारण त्याला कोणीही फसवू शकत नाही. अस्पृश्य समाजास काँग्रेसने आव्हान दिले म्हणूनच हे दोन शब्द मी सांगत आहे.

काँग्रेस आज जवळ जवळ 50-60 वर्षे राजकारण चालवित आहे. एवढ्या या दीर्घकालात आपण कमविले काय आणि गमविले काय याचा विचार कोणीही व्यवहारी मनुष्य करीत असतो. दरेक वाणी-उदमी प्रत्येक दिवाळीला हिशोब करतो. तसेच या देशाने, प्रत्येक चाणाक्ष माणसाने, काँग्रेसच्या राजकारणाचा आढावा घ्यावा. विशेषतः हिंदू लोकांनी याचा आढावा घ्यावा. ते त्यांचे कर्तव्य कर्म आहे. ज्या काँग्रेसने मोठमोठी वचने दिली त्याचा हिंदूंनी आढापाढा करावा. हिंदू लोक आढापाढा करतील की नाही हे मला माहित नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु आपण मात्र याचा जरूर विचार केला पाहिजे.

कॉंग्रेस ही हिंदुची संस्था आहे. कारण काँग्रेसला मुसलमान सोडून गेले, खिश्चन वेगळे झाले, पारशी वेगळे झाले आणि आपण तर वेगळे आहोतच ! आता कॉंग्रेसच्या भूलथापांना बळी पडून ज्या हिंदुनी स्वार्थत्याग केला त्यांच्या पदरात काय पडले ? हिंदूंना काही मिळो वा न मिळो, तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु, ज्याअर्थी हिंदुनी आम्हाला आव्हान दिले आहे त्याअर्थी आपमतलबी हिंदू-काँग्रेसबद्दल आपल्यातील ज्या कोणाला आस्था वाटत असेल त्यांनी या गोष्टीचा अवश्य विचार करावा.

काँग्रेसच्या कार्याचा आढावा मी देतो म्हणजे हिंदुच्या डोक्यात थोडा उजेड पडेल, मला जर कोणी विचारले की, काँग्रेसने जे काही मिळविले ते दोन-चार शब्दात तुम्ही सांगू शकाल काय ? तर मी अवश्य सांगू शकेन. मी सांगू शकेन की, काँग्रेसने जे काही मिळविले ते म्हणजे “पदोपदी पराजय.” सुरवातीपासून त्यांनी ज्या ज्या वेळी सिंहासारखी गर्जना केली त्या त्या वेळी त्यांना दुसऱ्याचे बूट चाटण्याची पाळी आली. काही लोक म्हणत होते की, आमचे पुढारी मवाळ आहेत. गांधी फार तिखट ते फार जहाल. त्यांनी कायदा मोडावयाचा, जंगले तोडावयाची व तुरुंगात जावयाचे, असे गांधीचे राजकारण. गांधींनी लोकांच्या हाती कोलीत दिले. लोकांनी 1921 साली एक पोलीस चौकी जाळली. गांधी फारच घाबरले. त्यांनी तो नाद सोडून दिला. नंतर त्यांनी तो मार्ग सोडून दिला. 1931 साली गांधी गोलमेज परिषदेला गेले. 1931 साली गांधी परत आल्यावर त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. गांधींना काही करता येईना. तुरुंगात गांधींची एवढी दुर्दशा झाली की, गांधींनी शेवटी आपल्या सुटकेसाठी बिलींग्डनला पत्र लिहिले. परंतु व्हाईसरॉय काही केल्या ऐकेना. गांधींनी पुष्कळ पत्रे लिहिली. पण त्यांचा काही उपयोग होत नाही असे पाहून शेवटी गांधींनी त्यांचा जुना दोस्त जनरल स्मस्ट्स यांना पत्र लिहून मध्यस्थी घातले. जनरल स्मस्ट्स मध्यस्थी पडून त्यांनी बिलींग्डनला पत्र लिहिले व अशा तऱ्हेने गांधींनी नामुष्कीने स्वतःची सुटका करून घेतली.

जे मिळेल ते पदरात पाडून घ्यायचे व उरलेल्यासाठी झगडावयाचे असे टिळक प्रभृतींचे ध्येय होते. गांधींच्या आज्ञेनुसार ‘साम्राज्याची अडचण ती आपली संधी’ या ध्येयसुत्राचा काँग्रेसने अवलंब केला. 1939 साली युद्ध सुरू झाले. 1939, 1940, 1941 साली काँग्रेसने काही केले नाही. 1942 चे अर्धे साल काँग्रेसवाले मूग गिळून गप्प बसले व 1942 ऑगस्टला ठराव केला की, ब्रिटिश सरकार ‘चले जाव’ ‘चले जाव’ म्हणून दरवाजावर प्रत्येक ठिकाणी लिहिण्यात आले. दरवाजावर ‘चले जाव’ म्हणून भाडेकरूला नोटिस देवून जर भाडेकरू जाऊ लागला तर मग त्याला घालवून देण्यासाठी कोर्टात जाण्याची काही आवश्यकता भासली नसती. 8 ऑगस्टला 10 वाजता ठराव झाला आणि 11 वाजता वारंट्स काढून काँग्रेस पुढाऱ्यांना तुरुंग दाखविण्यात आला. बाकीचे जे बाहेर राहिले त्यांनी चळवळ केली. त्यांनी जाळपोळ, लुटालूट, अत्याचार केले. त्यांनी कोर्ट, कचे-या जाळल्या, रेल्वे रूळ उखडण्यात आले. पोस्टाचे खांब, तारा वगैरे तोडण्यात आल्या. लाखो रुपयांचे नुकसान करण्यात आले. पण हे नुकसान झाले कोणाचे ? कोर्ट कचे-या कोणाच्या पैशातून बांधण्यात आल्या होत्या ? लोकांच्या पैशातूनच ना. रेल्वे रुळ कोणाच्या पैशातून बांधण्यात आले होते ? लोकांच्या पैशातूनच. हे खरे आहे की नाही ? मग काँग्रेसने नुकसान केले ते जनतेचे नुकसान केले की ब्रिटिश सरकारचे ? जे काही नुकसान करण्यात आले त्यापासून इंग्रज माणसाचे काही नुकसान झाले नाही. जे काही नुकसान झाले ते या देशातील गरीब जनतेचे झाले.

काँग्रेसचे जे लोक तुरुंगात होते त्यांची काय अवस्था होती ? त्यांची तुरुंगात चांगली बडदास्त होती. जवाहर वगैरे प्रभृतींना अहमदनगरच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यांच्यासाठी दिल्लीहून उत्तम प्रतीचे तांदूळ मागविण्यात येत होते. गांधींची तरी काही कमी व्यवस्था नव्हती. एवढेही करून शेवटी मला सोडा म्हणून गांधींनी व्हाईसरॉयला पत्र लिहिले. परंतु व्हाईसरॉय काहीच ऐकावयास तयार होईना. निदान मला भेटावयास तरी बोलवा असे गांधींनी पत्र लिहिले, त्याचा देखील काहीच उपयोग झाला नाही. शेवटी गांधीनी कसे तरी करून आपली सुटका करून घेतली.

आता 1945 साली सिमला कॉन्फरन्सचे काय झाले याचा विचार करू. असेंब्लीमध्ये असा नियम होता की, व्हाईसरॉय एकदा ठराव वाचून दाखवित असता सर्वानी उठून उभे राहावयाचे. नियमाप्रमाणे आम्ही सर्वजण उठून उभे राहत असू. काँग्रेसचे लोक मात्र तसेच बसून राहत असत. त्यांना उठून उभे राहण्याची लाज वाटत असे. त्यांचे म्हणणे असे की, आम्ही व्हाईसरॉयला मानीत नाही. तेव्हा त्यांच्यापुढे आम्ही उभे राहणार नाही. परंतु सिमला कॉन्फरन्सच्या वेळी आपणास काय दिसले ? व्हाईसरॉयनी जाहीर केल्याबरोबर काँग्रेसचे सर्व पुढारी नाक मुठीत धरून सिमल्याला पळत सुटले. कोणी गाडीतून गेला, कोणी घोड्यावरून गेला. तर कोणी गाढवावरून गेला. सिमल्याला त्यांनी गर्दी केली. सिमल्याला त्यांची एवढी गर्दी झाली की त्यांनी सिमल्याची अगदी घाण करून टाकली. जे लोक व्हाईसरॉयला मानीत नव्हते तेच लोक व्हाईसरॉयच्या घराजवळ धरणे धरून बसले.

असे हे गांधींचे राजकारण आहे. हे पराजिताचे राजकारण आहे. काँग्रेसचे लोक ही राजकारणात नापास झालेली पोरे आहेत. आपण नापास झालेल्या पोराला नोकरीवर घेत नाही. कारण तो लायक नसतो. म्हणून काँग्रेसचे पुढारी राजकारणात अगदी नालायक आहेत.

कॉंग्रेसच्या लोकांजवळ इतका पैसा आहे की, त्या पैशाच्या जोरावर वाटेल ते करता येईल. परंतु या पैशाचा काय उपयोग झाला ? हिंदू लोकांनी जो एवढा स्वार्थत्याग केला त्याचा काय उपयोग झाला ? जनतेने जो एवढा गांधींच्या म्हणण्याप्रमाणे स्वार्थत्याग केला त्याचा उपयोग काय झाला ? ज्या माणसाला एवढी परिस्थिती अनुकूल असता काही करता येत नाही तो पुढारीपणाला नालायक असला पाहिजे.

आता मी दुसरी बाजू सांगतो. या देशात अशा असंख्य जाती आहेत की. ज्यांच्यात संघटना नाही. त्यांच्यात अनेक भेदाभेद आहेत. कारण ते अनेक धर्मांचे व अनेक जातीचे आहेत. सर्व लोक आपापसातले भेद विसरून एकमेकावर विश्वास ठेवून, एकमुखाने जर काही मागू लागले तरच त्यांचा थोडा बहुत ब्रिटिश सरकार विचार करील आणि आपण जर जोरात मागणी केली तर इंग्रज सरकार हा देश सोडून जाईल. काँग्रेस ज्यावेळी स्थापण्यात आली, त्यावेळी तिच्या चालकांना आपल्या सर्वांच्या ऐक्याचे महत्त्व चांगले पटले होते. म्हणून आपणाला आढळून येईल की, काँग्रेसमध्ये सर्व धर्माचे लोक होते. त्यावेळी हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, पारसी वगैरे जातीचे लोक कॉंग्रेसचे अध्यक्ष झालेले आपणास आढळून येतात. म्हणून सर्व लोकांना काँग्रेसबद्दल आपुलकी वाटत होती.

1920 पासून काँग्रेसची सूत्रे गांधींच्या हाती गेली. त्यावेळेपासून मौलाना आझादशिवाय काँग्रेसचे सर्व सूत्रधार हिंदू आहेत. वर्किंग कमिटीवर फक्त दोनच मुसलमान आहेत. हा देश आता अशा बिकट परिस्थितीत आहे की, जातीय भेदाला आता राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. जातीजातीमध्ये जे भेद होते त्यास राजकारणाची जोड मिळाली आहे. मुसलमान आता केवळ धर्मानेच दूर राहिले नाहीत. आता ते राजकारणात देखील शत्रु झाले आहेत. कारण काँग्रेसने अल्पसंख्यांकांसाठी काही केले नाही याची जाणीव झाल्यामुळेच मुसलमान भराभर काँग्रेस सोडून जात आहेत. यावरून काँग्रेसच्या पुढा-यांच्या पात्रतेची जाणीव होते! राष्ट्रीय Nationalist मुसलमान आता काँग्रेसमधून फुटून निघून देशाची विभागणी करू पाहात आहेत. काँग्रेसला जन्म देणा-यांच्या मनात देशाची शकले करण्याची कल्पना स्वप्नात तरी आली असेल काय ? पण असे हे का झाले ? हे राजकारण वेड्या लोकांचे आहे की शहाण्या लोकांचे आहे ? जातीवादाचा हा भस्मासूर का भेडसावित आहे ? हा परिणाम कशाचा ? थोडा विचार केला तर हा परिणाम हिंदुच्या राजकारणाचा आहे हे चांगले दिसून येईल. मुंबईला जी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची बैठक झाली तिच्याकडे पाहिले तर हिंदुच्या राजकारणाचे मला आश्चर्य वाटते.

मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आहे की, आपल्याला राजकीय सत्ता मिळाल्याशिवाय आपला सामाजिक व धार्मिक उद्धार होणे अशक्य आहे. आपणास समता आणि स्वातंत्र्य मिळवावयाचे असेल, आपणास इज्जतीने जगावयाचे असेल, आपली प्रगती करून घ्यावयाची असेल तर या देशाला मिळणा-या सत्तेमध्ये आपण भागिदार झालेच पाहिजे. राजकीय सत्ता हे एक प्रभावी शस्त्र आहे. या शस्त्रास आपण देवाप्रमाणे मानले पाहिजे. आपण या शस्त्राची पूजा करावयास पाहिजे, म्हणजे या शस्त्राचा उपयोग आपणास आपल्या शत्रूवर करता येईल. हे शस्त्र मिळविणे आगामी निवडणुकीवर अवलंबून आहे. म्हणून भावी निवडणूक म्हणजे आपल्या जीवन मरणाचा संग्राम आहे. या निवडणुकीवर आपल्या जीवनाचा आणि मरणाचा प्रश्न अवलंबून आहे. या जीवन मरणाच्या दारूण संग्रामात आपण विजयी यशस्वी झालेच पाहिजे. हा लढा जिंकण्यासाठी आपण जय्यत तयारी केली पाहिजे. या जय्यत तयारीस आपण आतापासूनच लागले पाहिजे.

सध्या हिंदुस्थानचा राज्यकारभार पाहण्यासाठी एकंदर 15 मंत्री आहेत. मीही त्या 15 पैकी एक आहे. हे आपणाला माहीत आहे ना ? मी व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये फक्त दोनच वर्षे आहे. परंतु या दोन वर्षात मी आपणासाठी काय केले ? अस्पृश्य समाजाच्या शिक्षणाची जबाबदारी जी कधीही आपल्यावर घेतली नव्हती ती मध्यवर्ती सरकारने घेतली. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी बांधण्यासाठी हिंदुस्थान सरकारने 20 लाख रुपये दिले. आता देखील त्या युनिव्हर्सिटीचे जवळ जवळ 41 हजार रुपयाचे बील सरकारजवळ येऊन पडले आहे. अलिगड युनिव्हर्सिटी बांधण्यासाठी मुसलमानांना 20 लाख रुपये देण्यात आले होते आणि प्रत्येक वर्षी 3 लाख रुपये अलिगड युनिव्हर्सिटीसाठी मध्यवर्ती सरकार देत असते. अस्पृश्य समाजाच्या शिक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे याची कल्पना सरकारला स्वप्नात देखील झाली नाही. मी गेल्यानंतर अस्पृश्य समाजाच्या शिक्षणासाठी 3 लाख रुपये मंजूर करून घेतले. या तीन लाख रुपयांमधून प्रत्येक वर्षी 300 विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल. यावेळी 30 विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणार आहेत. त्याचप्रमाणे दरवर्षाला 15 विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जावू शकतील. आपल्यापैकी असा कोणी विलायतेला गेला आहे काय ? साहेबाचा बटलर म्हणून कोणी कदाचित गेला असेल. यावेळी जाणाऱ्या 30 विद्यार्थ्यांमध्ये एक भंगी, एक मांग आणि किती तरी चांभार आहेत. मला हेच सांगावयाचे आहे की, या योजनेचा फायदा अस्पृश्यांतील प्रत्येक जातीला करून घेता येईल.

प्रॉव्हीन्शियल सर्व्हिसेसमध्ये आणि सेन्ट्रल सर्व्हिसेसमध्ये 25 टक्के मुसलमानांसाठी जागा राखून ठेवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ख्रिश्चन, शिख व अँग्लो इंडियन यांच्यासाठी ठराविक नोकऱ्याचे प्रमाण राखून ठेवण्यात आले आहे. परंतु अस्पृश्य समाजाकडे कोणी लक्ष दिले आहे का ? आपल्यासाठी काही सोय करण्यात आली होती काय ? आपणाला एक तुकडा देखील दिला गेला नव्हता. मी मात्र तशी सोय करुन घेतली आहे. अस्पृश्य समाजासाठी शेकडा आठ पूर्णांक एक तृतीआंश इतके प्रमाण नौक-यांमध्ये राखून ठेवले आहे. मी गेल्यापासून आपले पुष्कळ लोक मोठ्या हुद्यावर चढले आहेत. आपल्यापैकी एक डेप्युटी सेक्रेटरी टू दी गव्हर्नमेन्ट ऑफ इंडिया आहे. दुसरा एक अन्डर सेक्रेटरी आहे. तीन एक्झीक्युटिव्ह इंजिनियर आहेत. सिमल्याला माझ्या डिपार्टमेन्टचा एक भाग आहे तेथे एकंदर 28 क्लार्क आहेत. त्यापैकी 18 भंगी आहेत.

राजकीय सत्तेच्या जोरावर मनुष्य काय करू शकतो याचे हे एक चांगले उदाहरण आहे. मी हे माझा बडेजाव अगर गौरव करण्यासाठी सांगत नाही. तर आपल्या हाती राजकीय सत्ता आली तर आपण काय करू शकू हे मी जर दाखविण्यासाठीच मी हे सांगत आहे. माझ्या जोडीला आणखी एखादा आपल्यापैकी मंत्री असता तर आम्ही दोघांनी पुष्कळच केले असते. प्रत्येक डिपार्टमेन्टमध्ये फक्त पाच पाच वर्षे राहिलो तर आपल्या लोकांचे पुष्कळ कल्याण करता येईल. राजकीय सत्तेशिवाय आपणास काही करता येणार नाही म्हणून आपण राजकीय सत्तेसाठी झगडले पाहिजे. Politics should be the life-blood of the Scheduled Castes. आपला जो नाश झाला आहे. आपण आज हजारो वर्षे खितपत पडलो आहो त्याचे कारण आपणास राजकीय सत्ता नव्हती. ही सत्ता आपण मिळविली पाहिजे. राजकीय सत्ता ही एक अजब शक्ती आहे. तिचा उपयोग आपण आपल्या शत्रुवर केला पाहिजे.

निवडणुकीसाठी एक पार्लमेंटरी बोर्ड स्थापण्यात आला आहे. या पार्लमेंटरी बोर्डावर पाच माणसे राहतील. त्यांनी उमेदवार निवडावयाचे आहेत. त्या बोर्डाला काही नियम घालून दिले आहेत. त्या नियमाप्रमाणे निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यात येतील. आपण अशाच उमेदवारांना निवडून दिले पाहिजे. ज्याला वाटत असेल की, असेंब्लीमध्ये तो एकटाच वाटेल ते करू शकेल, तर तो त्याचा मुर्खपणा आहे. जे काही करू शकेल तर तो पक्षच करू शकेल. गेल्यावेळी काँग्रेसला फक्त स्वतंत्र मजूर पक्षाचे भय होते. कारण त्यांना माहित होते की, हजारो रुपये जरी दिले तरी आपला सभासद ते घेणार नाही.

पार्लमेंटरी बोर्ड जे काही करील आणि जी माणसे निवडली जातील त्याच माणसाला आपण निवडले पाहिजे, तुम्ही सर्वांनी शपथ घेतली पाहिजे की. आपण ही निवडणूक जिंकूच म्हणून.

माझे असे ठाम मत आहे की, विद्यार्थी दशेत विद्यार्थी विद्यार्थीनींनी राजकारणात भाग घेता कामा नये. कारण अभ्यास सोडून ते जर राजकारणात पडले तर त्यांच्या आयुष्याचे नुकसान होते, परंतु यावेळी मात्र तो नियम ढिला केला पाहिजे. त्यांनी आपल्या अडाणी जनतेला मतदारांच्या यादीत नाव घालावयास मदत केली पाहिजे. त्यांना निवडणुकीची सर्व माहिती दिली पाहिजे.

हे इलेक्शन हिंदुस्थानच्या इतिहासात स्मरणीय होणार आहे. कारण घटनेचा नवीन बंधारा तयार करावयाचा आहे. या इलेक्शननंतर जी घटना समिती निर्माण होणार आहे. ती जे काही घटनेचे बंधारे तयार करणार आहे, ते बंधारे पुष्कळ दिवस टिकणार आहेत. त्या भावी घटनेत आपला भाग काय राहील याकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. आपण जे निरनिराळे ठराव पास केलेले आहेत त्यामध्ये आपली योजना आपण जाहीर केली आहे. हे इलेक्शन म्हणजे खरोखरच आपल्या जीविताचा किंवा मरणाचा प्रश्न आहे. आपण जर यावेळी जागृत राहिलो नाही तर आपला नाश झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे हे जे ‘स्वराज्य’ होणार आहे ते आपल्यावर जुलमी राज्य होणार आहे.

आपणाला योग्यवेळी मार्ग दाखविण्याचे मी माझे कर्तव्य बजाविले आहे. तुम्ही तुमच्या कर्तव्यास कितपत जागता हेच मला पाहावयाचे आहे. तुम्ही आपले कर्तव्य योग्य तऱ्हेने पार पाडाल याची मला खात्री आहे.

डॉ. बाबासाहेबांच्या भाषणानंतर पुष्पहारादी समर्पण समारंभ होऊन सभा विसर्जित झाली.

या तीन दिवसांच्या वरील कार्यक्रमाशिवाय अखिल भारतीय समता सैनिक दलाच्या वर्किंग कमिटीची सभा अहिल्याश्रमात तारीख 2-10-1945 रोजी श्री. जे. एच. सुबय्या यांचे अध्यक्षतेखाली होऊन मागील कामकाजाचा आढावा घेतला गेला व दलाच्या घटनेत काही दुरुस्ती करण्यात आली. तसेच अ. भा. दलाचे शिक्षण केंद्र नागपूर येथे उघडण्याचे ठरविण्यात येऊन त्याच्या व्यवस्थेची जबाबदारी जनरल सेक्रेटरी आर. आर. पाटील (नागपूर) यांचेवर सोपविण्यात आली व सभेचे काम संपविण्यात आले. तारीख 4-10-1945 रोजी पुणे येथील समता सैनिक दलाच्या अजिंक्य पथकास रा. ब. शिवराज यांनी श्री. पी. एन. राजभोज व श्री. आर. डी. भंडारे यांचे समवेत भेट दिली. सदर प्रसंगी दलाच्या पथकातर्फे रा. ब. शिवराज यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

अशाप्रकारे वर्किंग कमिटीच्या बैठकीच्या अनुषंगाने अनेक कार्यक्रम पार पाडले गेल्यामुळे तिन्ही दिवस मोठ्या आनंदाचे व उत्साहाचे गेले.

या तिन्ही दिवशी स्थानिक फेडरेशनतर्फे व कार्यकत्यांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व वर्किंग कमिटीचे सभासद यांची उत्तम प्रकारची व्यवस्था ठेवली गेली होती.

शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या या वर्किंग कमिटीच्या बैठकीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विशाल मार्गदर्शिकत्वाखाली अस्पृश्य समाजाचे राजकारण उंच पातळीवर नेऊन ठेवले आहे, यात कसलीही शंका नाही.

वर्किंग कमिटीने केलेल्या मार्गदर्शनाने, अस्पृश्य वर्ग, आपल्या पोलादी संघटनेने, येत्या निवडणुकीत प्रतिपक्षांचा धुव्वा उडवून संपूर्णपणे यशस्वी होणारच होणार ही सर्वांची खात्री झालेली आहे.

अशाप्रकारे सर्व कार्य आटोपल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तारीख 4-10-1945 रोजी रात्रीच्या गाडीने मुंबईस रवाना झाले. रा. ब. शिवराज मद्रासकडे व वर्किंग कमिटीचे इतर सभासद आपापल्या प्रांताकडे रवाना झाले.

शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या वर्किंग कमिटीची ही बैठक हिंदी राजकारणाच्या इतिहासात जशी महत्त्वाची ठरेल त्याचप्रमाणे पुणेकर अस्पृश्यांच्या चिरंतन स्मरणात राहील यात कसलीच शंका नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password