Categories

Most Viewed

01 सप्टेंबर 1951 भाषण

“आमच्या सर्व सामाजिक दुखण्यांवर उच्च शिक्षण हेच औषध.”

पीपल्स एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित औरंगाबाद येथील मिलींद महाविद्यालयाच्या इमारतीची कोनशिला भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांच्या हस्ते 1 सप्टेंबर 1951 रोजी बसविण्यात आली. याप्रसंगी डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी, डॉ. आंबेडकर अस्पृश्य आणि गोरगरिब समाजात करीत असलेल्या शिक्षण प्रसार प्रचार कार्याबद्दल गौरवोद्गार काढून कौतुक केले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ध्येय आणि उद्दीष्टांची त्यांनी प्रशंसा केली. राष्ट्रपतींनी प्रत्यक्ष कोनशिला बसवण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण केले. ते म्हणाले.

अध्यक्ष महाराज,

ज्या कॉलेजची कोनशिला बसविण्याची मी तुम्हाला विनंती करीत आहे ते हे कॉलेज 19 जून 1950 रोजी अस्तित्वात आले आहे. हे कॉलेज सुरू करून त्याचा एकंदर कारभार पाहाणान्यांबद्दल आणि कॉलेज का सुरू करण्यात आले याबद्दल आजच्या प्रसंगी दोन शब्द सांगितले तर ते अनाठायी होणार नाही, असे मला वाटते. ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई या संस्थेने हे कॉलेज चालविले असून या संस्थेचे अध्यक्षपद माझ्याकडे आहे. ही सोसायटी 1945 मध्ये स्थापन करण्यात आली. साधारणपणे देशभर आणि मुख्यत्वे मागासलेल्या वर्गात उच्च शिक्षणाचा प्रसार करणे हे या संस्थेचे ध्येय व उद्दिष्ट आहे. याच ध्येयानुसार मुंबईत 1946 साली सिद्धार्थ या नावाचे एक कॉलेज उघडण्यात आले आणि मला सांगायला आनंद वाटतो की, अवघ्या चार वर्षांच्या अवधीत विद्यार्थ्यांची संख्या, देशी विदेशी खेळ आणि शैक्षणिक दर्जा या सर्वच बाबतीत सिद्धार्थ कॉलेजने मुंबई राज्यात महत्त्वाचे स्थान पटकावले आहे. या कॉलेजमध्ये 800 विद्यार्थी आहेत. दुसरीकडे विद्यार्थ्यांची एवढी मोठी संख्या क्वचितच आढळेल. आंतर कॉलेज खेळांच्या सामन्यात असा एकही प्रकार सापडणार नाही की, ज्यात सिद्धार्थ कॉलेजने विजय मिळविला नाही, मुंबई विश्वविद्यापीठाच्या नामांकित शिष्यवृत्त्या किंवा बक्षिसेही कॉलेजने हातून जाऊ दिलेली नाहीत. सिद्धार्थ कॉलेजच्या या उज्ज्वल परंपरेबद्दल पीपल्स एज्युकेशन सोसायटीला साहजिकच अभिमान वाटतो.

मुंबईत चालविलेल्या या कॉलेजच्या या चार वर्षांच्या अनुभवाने उत्तेजित झाल्यामुळेच आपल्या कार्याचा पसारा इतर ठिकाणी आपण वाढवू शकू पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या गव्हनींग बॉडीला वाटले.

हे कॉलेज उघडण्यासाठी हैद्राबाद संस्थानाचीच का निवड करण्यात आली. असे कदाचित विचारण्यात येईल. याचे कारण अगदी साधे आहे. शिक्षणाच्या बाबतीत हैद्राबाद संस्थान बरेच मागासलेले आहे आणि उच्च शिक्षणाच्या बाबतीत तर अगदीच मागासलेले आहे.. हैद्राबाद संस्थानचे क्षेत्रफळ चौन्यांशी हजार चौरस मैल असून एक कोटी साठ लक्ष लोकसंख्या आहे. मार्च 1949 मध्ये संस्थानात एकूण 17 कॉलेजेस होती. कॉलेजचे शिक्षण घेणाऱ्यांची संख्या 7615 होती. या आकड्यांची मुंबई राज्यातील स्थितीशी तुलना करू. या मुंबई राज्याचा विस्तार एक लक्ष पंधरा हजार पाचशे सत्तर चौरस मैल आहे. आणि लोकसंख्या 3.23 कोटी आहे. 31 मार्च 1950 रोजी त्यातील कॉलेजेसची संख्या 90 आणि त्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण 50356 होती.

हैद्राबाद संस्थान उच्च शिक्षणाच्या बाबतीत किती मागे आहे हे या आकड्यांवरून दिसून येईल. हे असे का ? याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. मला वाटलेच तर याबाबतीत हैद्राबाद सरकारला मी स्वतंत्र मसुदा विचारार्थ सादर करीन. सद्य:स्थितीत आमच्या कार्याच्या विस्तारासाठी हैद्राबाद संस्थानच योग्य आहे असे आम्हाला वाटले.

हैद्राबाद संस्थानचा शैक्षणिक मागासलेपणा वगळला तरी खोलवर पाहिल्यास दुसरी एक खेदकारक घटना दिसून येते. ती म्हणजे शैक्षणिक सवलतीची असमाधानकारक व असमर्थनीय विभागणी ! जे काही थोडे बहुत उच्च शिक्षण हैद्राबाद संस्थानात दिसते ते फक्त हैद्राबाद शहरातच आहे. एकंदर सतरा कॉलेजेसपैकी फक्त इंटरपर्यंत शिक्षण देणारी तीन कॉलेजेस सोडली तर बाकीची सगळी कॉलेजेस संस्थानची राजधानी असलेल्या हैद्राबाद शहरातच आहेत आणि इंटरपर्यंत असलेल्या या तीन कॉलेजेसपैकी ऐंशी लक्ष लोकवस्तीच्या तेलंगणा भागासाठी वरंगळ येथे एक आहे. पंचेचाळीस लक्ष लोकवस्ती असलेल्या मराठी भागासाठी औरंगाबादेत दुसरे आणि पस्तीस लक्ष लोकवस्ती असलेल्या भागासाठी कर्नाटक येथे तिसरे आहे.

ही उणीव भरून काढण्यासाठी सोसायटीने हैद्राबाद संस्थानची निवड केली. औरंगाबादऐवजी संस्थानच्या तेलगण किया कर्नाटक भागात सोसायटीला हे कॉलेज काढता आले असते असे कदाचित म्हटले जाईल. जातीय किंवा भाषिक भावनाशी आमच्या सोसायटीला काही कर्तव्य नाही. सोसायटीचा मुख्य उद्देश जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे शैक्षणिक सेवा करणे हा आहे. मुंबईचे सिद्धार्थ कॉलेज चालविण्यात जसे यश मिळाले तशाच प्रकारचे यश या नवीन प्रयत्नातही मिळविण्याची सोसायटीची पहिल्यापासूनच इच्छा होती. मुंबईच्या निष्णात अध्यापकांपैकी काहींना इकडे आणण्यास सोसायटी उत्सुक होती पण असे आढळून आले की, केवळ मराठी बोलणारे प्राध्यापकच स्वेच्छेने येथे येण्यास तयार झाले आणि ह्याच कारणास्तव सोसायटीने औरंगाबादला कॉलेज सुरू केले.

कॉलेजने केलेल्या प्रगतीवरून सोसायटीने औरंगाबादची केलेली निवड योग्य आहे असे म्हणावयास हरकत नाही. कॉलेजच्या प्रगतीची माहिती देण्यापूर्वी सोसायटीच्या गव्हनींग बॉडीच्या धोरणाची कल्पना येण्यासाठी कॉलेजच्या काही विशिष्ट गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात.

नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे या कॉलेजमध्ये मुलांच्या बरोबरच मुलीही शिक्षण घेत आहेत. सामाजिक मागासलेपणा आणि सहशिक्षणाचा गंधही नसलेल्या या भागात मुलांच्या बरोबरीने मुलींनाही शिक्षण देऊन कॉलेज एक नवीनच पायंडा घालीत आहे. या कॉलेजमध्ये सर्व जातीच्या व धर्माच्या मुली शिक्षण घेत आहेत. मुलींना शिक्षणाला उत्तेजन मिळावे व मोठ्या संख्येने त्यांनी कॉलेजमध्ये यावे म्हणून शहरापासून कॉलेजपर्यंत येण्याकरिता कॉलेजने एक बसही ठेवली आहे. या कॉलेजचे द्वार सर्व धर्मियांना मोकळे आहे. येथे कोठल्याच प्रकारची जातीयता नाही. कॉलेजच्या प्राध्यापक वर्गात सर्व धर्मांचे आणि जातींचे प्राध्यापक आहेत. विद्यार्थ्यांत विद्या, विनय आणि शील बनविणे हे कॉलेजचे ध्येय आहे.

अस्पृश्य आणि मागासलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे हे कॉलेज खास लक्ष पुरवते. ज्याची चिन्हे आताच आपण पाहात आहोत असा खालचा वर्ग व वरचा वर्ग यांच्यातील संभाव्य संघर्ष टाळावयाचा असेल तर सर्व कॉलेजांनी हेच करायला पाहिजे अस्पृश्य विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढत आहे आणि सध्या कॉलेजमध्ये सव्वीस अस्पृश्य विद्यार्थी असून त्यात विद्यार्थीनीही आहेत.

या कॉलेजच्या एका वर्षातील प्रगतीवरून अशा प्रकारच्या कॉलेजची या भागात असलेली उणीव भरून निघाली आहे. हे सिद्ध होते. 19 जुन 1950 रोजी कॉलेज सुरू झाले त्यावेळी फक्त 140 विद्यार्थी होते. आज विद्यार्थ्यांची संख्या 332 असून जागेच्या अभावी पहिल्या वर्षाच्या वर्गाकरिता प्रवेश बंद करणे भाग पडले.

हे कॉलेज सर्व साधनांनी युक्त करण्याकरिता सोसायटीच्या गव्हर्निंग बॉडीने कोणतीही संधी दवडली नाही. कॉलेजने 1 लक्ष 26 हजार रुपये खर्च करून लेबोरेटरी, सर्व प्रकारची उपकरणे व साधने यांनी सुसज्ज केली आहे आणि तज्ज्ञ डेमॉन्स्ट्रेटरच्या देखरेखीखाली सायन्सच्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतः प्रयोग करण्यास संधी मिळते.

जरी एक वर्ष झाले असले तरी कॉलेजला एक सुन्दर लायब्ररी आहे. तीत कॉलेजला लागणारी सर्व प्रकारची पुस्तके आहेत. सोसायटीने या लायब्ररीकरिता चाळीस हजार रुपये खर्च केले असून एक वर्षाच्या आतच चार हजार पुस्तकांचा संग्रह केला वाङ्मयीन आणि चौसष्ठ विषयावरील मासिके येथे येत असतात. कॉलेज विद्यार्थी आणि संशोधन करणारे विद्यार्थी या दोघांनाही उपयुक्त होईल अशी ही लायब्ररी व्हावी अशी सोसायटीची इच्छा आहे.

विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होण्यासाठी खेळ आणि व्यायाम याकडे खास लक्ष पुरविले जाते. मुलांच्या शास्त्रीय आणि बौद्धिक विकासाकडेही लक्ष दिले जाते. विद्यार्थ्यांत शास्त्रीय विषयांची आवड निर्माण करण्यासाठी तांत्रिक, औद्योगिक आणि संशोधन स्थळांच्या सफरी करण्यात येतात. वादविवाद, वाङ्मय आणि सायन्स अशी मंडळे स्थापन करण्यात आली आहेत आणि या सर्वांचा फायदा पुष्कळ विद्यार्थी घेत आहेत.

केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्वसाधारण जनतेलाही कॉलेजने शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. या दिशेने अन्नधान्य आणि जनता या युनेस्कोने सुचविलेल्या विषयावर व्याख्यानमाला ठेवण्यात आली होती. ही व्याख्यानमाला फारच लोकप्रिय झाली आणि वर्तमानपत्रांनी तिचे स्वागत केले. कॉलेज आणि जनता यांच्यातील हा परस्परसंबंध असाच टिकविण्याचा कॉलेज प्रयत्न करील.

प्राथमिक अवस्थेत असलेले हे कॉलेज कोणत्याही बाबतीत मागे नाही. किंबहुना कॉलेजच्या प्रत्येक बाबतीत जिवंतपणा असून ते मोठ्या जोमाने वाढत आहे.

लोकांच्या डोळ्यात भरण्यासारखे कॉलेजने जे काही मिळविलेले असेल त्याचे सर्व श्रेय केवळ कॉलेजलाच जावे असे मी म्हणत नाही. तर त्याचे इतरही वाटेकरी आहेत आणि याकरता सोसायटी सर्वांची ऋणी आहे, हे मी जाहीर करतो. या यशाच्या वाटेक-यात जे माझे मित्र आहेत त्यात हैद्राबादचे माजी शिक्षण मंत्री श्री. राजा धोंडी राज बहादुर हे आहेत. त्यांच्या मदती शिवाय कॉलेज सुरू करणेच शक्य झाले नसते. तद्नंतर हल्लीचे मुख्य प्रधान श्री. एम. के. वेलोदी, अर्थमंत्री श्री. सी. व्ही. एस. राव महसूल मंत्री श्री. शेषाद्री. शिक्षण मंत्री श्री. रामकृष्ण राव. त्याचप्रमाणे माझे सहकारी मित्र श्री गोपालस्वामी अय्यंगार, मिनिस्टर फॉर स्टेट, उस्मानिया युनिव्हर्सिटीचे व्हाईस चॅन्सेलर नवाब अल्लीयावर जंगबहादूर, हैद्राबाद शेड्यूल्ड कास्ट ट्रस्ट फंडाचे सेक्रेटरी श्री. आबासे, औरंगाबादचे त्यावेळचे कलेक्टर श्री. राजवाडे, लँड अँक्विझिशन ऑफिसर श्री. अष्टपुत्रे. हैद्राबाद स्टेट कॉग्रेसचे अध्यक्ष श्री. बिंदू. पी. डब्ल्यू. डी. मंत्री श्री. नबाबजंग यावरजंग, पी. डब्ल्यु. डी. चे आर्किटेक्ट दवे या सर्वांचे मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो. आभार मानताना कॉलेजचे प्रिन्सिपाल आणि त्यांचा इतर सहकारी वर्ग यांना मी विसरू शकत नाही. कारण त्यांनी आपली घरेदारे मुंबईत सोडून औरंगाबादला येण्याचा अपूर्व स्वार्थत्याग केलेला आहे.

सध्या कॉलेजमध्ये बी. ए. आणि इंटर सायन्सपर्यंत शिक्षण दिले जाते. परंतु पुढील वर्षी सायन्स डिग्रीपर्यंतचे वर्ग उघडून हे संपूर्ण कॉलेज करण्याचे ठरविले

सध्या कॉलेज भाड्याच्या बंगल्यात आहे. हे बंगले कॅन्टोनमेंट विभागात असल्यामुळे दोन महिन्याची नोटीस देऊन खाली करण्यास मिलिटरी केव्हाही सांगू शकेल. ही परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. या परिस्थितीमुळे कॉलेजच्या कायम अस्तित्वाबद्दल संशय निर्माण होऊ शकतो. कॉलेजच्या गरजेच्या मानाने सध्याची जागा अगदीच अपुरी पडते. तसेच विद्यार्थ्यांकडून होस्टेलची मागणी करण्यात येत आहे. कारण स्थानिक विद्यार्थ्यांपेक्षा बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे आणि शहरात इतरत्र राहण्याची पुरेशी सोय नाही. या सर्व कारणांमुळे कॉलेजला स्वतःची इमारत बांधणे अत्यंत जरुरी आहे आणि त्या दृष्टीने सोसायटीने इमारत बांधायला सुरवात केली आहे. या इमारतीत बाराशे विद्यार्थ्यांची सोय होईल एवढे वर्ग, एक सभागृह आणि होस्टेल हे असेल. यासाठी सोसायटीने शहरापासून अडीच मैलाच्या अंतरावर एकशे पंचावन्न एकर जागा खरेदी केली आहे. या जागेच्या भोवतालचे दृश्य रमणीय असून लगतच जीत, पोहण्याची आणि बोटींगची व्यवस्था आहे अशी औरंगाबादेतील सुप्रसिद्ध पाणचक्कीही आहे.

अशा तऱ्हेने हे कॉलेज हैद्राबाद संस्थान आणि औरंगाबाद शहर या दोहोंना ललामभूत करण्याचा सोसायटीचा मानस आहे. तरी पण कॉलेजला अशी स्थिती प्राप्त होईल की नाही याबद्दल सोसायटीला चिंता वाटते. कॉलेजच्या या पहिल्याच वर्षाच्या आयुष्यात सोसायटीला 1 लाख 7 हजार रुपयांची तूट आली. विद्यार्थ्यांची संख्या थोडीशी वाढल्यामुळे या वर्षी ही थोडीशी कमी येईल. तरी पण अशी काही भीतीदायक कारणे आहेत की ज्यामुळे तोटा हा अनिश्चितकाळ येत जाईल आणि कॉलेज चालवण्याचे सोसायटीचे प्रयत्न कदाचित् निष्फळ ठरतील. ती कारणे एवढी गंभीर आहेत आणि अगदीच थोड्या लोकांना त्याची कल्पना असल्यामुळे ती जाहीरपणे प्रकट करावीत असे मला वाटते.

पहिले कारण म्हणजे उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या इंटरपर्यंतच्या कॉलेजचे अस्तित्त्व पीपल्स एज्युकेशन सोसायटीने औरंगाबादला आपले कॉलेज उघडण्यापूर्वी पासूनच उस्मानिया युनिव्हर्सिटीचे हे कॉलेज येथे अस्तित्त्वात आहे. हे खरेच आहे. पण दोन्ही कॉलेजे सुरळीत चालण्याएवढी विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी नसल्यामुळे ते कॉलेज सोसायटीच्या कॉलेजशी प्रतिस्पर्ध्याप्रमाणे वागत आहे. संस्थानात अशी अनेक शहरे आहेत की, ज्या ठिकाणी इमारतीची सोय आहे. पण कॉलेज नाही. संस्थानी प्रजेच्या आणि आपल्या स्वतःच्या फायद्याच्या दृष्टीने अशाच एखाद्या शहरात आपले कॉलेज नेणे उस्मानिया युनिव्हर्सिटीला सहज सोपे होईल. उस्मानिया युनिव्हर्सिटी आपले कॉलेज औरंगाबादहून संस्थानातील दुसऱ्या एखाद्या शहरी नेईल असे सोसायटीला सांगण्यात आले होते. हे करण्याऐवजी औरंगाबादेतच कॉलेज ठेवण्याचा उस्मानिया युनिव्हर्सिटीचा प्रयत्न चालू आहे. युनिव्हर्सिटीच्या सर्व विद्यार्थ्यांची सोसायटीचे कॉलेज आपल्यात सोय करू शकेल, यासाठी कॉलेजमध्ये जरूर ती तरतूद आहे. या उलट उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या कॉलेजच्या जागेच्या बाबतीत एवढी कठीण स्थिती आहे की ते आपल्या प्रयोगशाळा (लेबोरेटरी) कालेअरक (औरंगाबादेतील निजाम सरकारचा जुना राजवाडा) या इमारतीत हलवीत आहे. असे समजते की या कामासाठी दहा हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पण कॉलेजला योग्य अशा सरकारी इमारती असलेल्या मराठवाडा भागातील मोमिनाबाद शहरीच कॉलेज आणि लेबोरेटरीज नेणे योग्य होणार नाही का ? असे केल्यास दुसऱ्या एका जिल्ह्याला उच्च शिक्षणाची संधी मिळेल आणि सोसायटीचे कॉलेजही निरर्थक चढाओढीतून मुक्त होईल,

दुसरी अडचण फी संबंधीची आहे. उस्मानिया युनिव्हर्सिटीला आपल्या अधिकारात कॉलेजची प्रवेश फी ठरविण्याचा हक्क आहे. उस्मानिया युनिव्हर्सिटीत वर्षाची 60 रुपये म्हणजे अगदी कमीत कमी समजली जाणारी फी ठरलेली आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजला वर्षाची 120 रुपये फी घेण्याची उस्मानिया युनिव्हर्सिटीकडून परवानगी देण्यात आली आहे. हे खरे आहे. तरी सुद्धा लगतच्याच नाशिक आणि खानदेश या मुंबई युनिव्हर्सिटीच्या जिल्ह्यातील कॉलेजात घेण्यात येणाऱ्या फीशी तुलना केल्यास ही फी फारच कमी आहे. फी च्या या कमी प्रमाणाला संस्थानातील प्रजेच्या आर्थिक स्थितीशी काही कर्तव्य नाही. त्याचा आर्थिक दर्जा कोणत्याही तऱ्हेने जवळच्या संस्थानातील प्रजेच्या आर्थिक दर्जाहून कमी नाही.

उत्पन्नाचा एक मार्ग म्हणून युनिव्हर्सिटी फीकडे पाहात नसल्याने युनिव्हर्सिटीला एवढी कमी फी ठेवणे परवडते. पूर्वीच्या कराराप्रमाणे (चार्टर) हैद्राबाद सरकार युनिव्हर्सिटीचे सर्व प्रकारचे उत्पन्न म्हणजे सरकारी महसूल समजे युनिव्हर्सिटी केवळ वसूल करणारी एजंट. तिला उत्पन्नाशी काही कर्तव्य नव्हते. युनिव्हर्सिटीची प्राप्ती म्हणजे सरकार कडून मिळणारी वार्षिक ग्रैंट.

तिसऱ्या कारणाचा संबंध प्राध्यापकांच्या पगाराच्या प्रमाणाशी येतो. उस्मानिया युनिव्हर्सिटीला आपल्या अधिकारात खाजगी कॉलेजमधील प्राध्यापक वर्गाचे पगाराचे प्रमाण ठरवून देण्याचा हक्क आहे. औरंगाबादमधील उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या कॉलेजातील प्राध्यापक वर्गाच्या पगाराचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे.

प्रिन्सिपाल पगार रुपये 1,200 ते 1,700
प्रोफेसर पगार रुपये 800 ते 1,500
लेक्चरर पगार रुपये 300 ते 800
रीडर पगार रुपये 350 ते 800

औरंगाबादमधील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजसाठी युनिव्हर्सिटीने ठरवून दिलेले पगाराचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे.

प्रिन्सिपाल पगार रुपये 500 ते 700
लेक्चरर पगार रुपये 250 ते 400
ज्युनियर लेक्चरर पगार रुपये 180 ते 325

उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या कॉलेजांमधील प्राध्यापकांच्या पगाराचे प्रमाण निःसंशय फारच जास्त आहे. उस्मानिया युनिव्हर्सिटीने सोसायटीच्या कॉलेजसाठी ठरवून दिलेले पगाराचे प्रमाण हे सोसायटीने स्वतःच्या कॉलेजसाठी ठरविलेल्या प्रमाणापेक्षा काहीसे कमी आहे. हे खरे आहे पण शेजारच्या नाशिक आणि खानदेश जिल्ह्यातील कॉलेजच्या फी तील फरक आणि तेथील पगाराचे प्रमाण याच्याशी तुलना केल्यास हे प्रमाण अतिशय जास्त आहे आणि ते कॉलेजच्या आर्थिक स्थितीवर जड ओझेच होऊन बसते.

चौथे कारण सरकारी ग्रैंट संबंधीचे. हैद्राबाद संस्थानातील कॉलेज शिक्षण म्हणजे उस्मानिया युनिव्हर्सिटीची मक्तेदारीच होऊन बसली आहे. उच्च शिक्षणाबाबतच्या सर्व प्रकारच्या जबाबदारीपासून आपण स्वतः वेगळे राहून हैद्राबाद सरकारने ती कामगिरी उस्मानिया युनिव्हर्सिटीकडे सोपविली आहे. सरकारची जबाबदारी म्हणजे संस्थानातील कॉलेज शिक्षणासाठी उस्मानिया युनिव्हर्सिटीला फक्त वार्षिक ग्रँट देणे ही होय. याच रकमेतून आपल्या कॉलेजला ग्रँट मिळेल अशी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची अपेक्षा होती. पण घटक कॉलेजचा योगक्षेम चालविणे एवढीच आपली जबाबदारी असून संलग्न, युनिव्हर्सिटीला जोडलेल्या कॉलेजचा ग्रँटवर काहीच हक्क नाही, असा उस्मानिया युनिव्हर्सिटीचा युक्तिवाद आहे. याच कारणास्तव सोसायटीचे कॉलेज हे युनिव्हर्सिटीला जोडण्यात आलेले असल्यामुळे त्याला उस्मानिया युनिव्हर्सिटीकडून मदत, ग्रँट नाकारण्यात आली. उलट सरकारचे म्हणणे असे आहे की जेवढी ग्रँट देण्यास आपण बांधलेले आहोत तेवढी ग्रँट आपण उस्मानिया युनिव्हर्सिटीला दिली आहे. म्हणून सोसायटीच्या कॉलेजच्या ग्रँटची जबाबदारी आपल्यावर नाही आणि आपण अधिक काही करू शकत नाही. याचा परिणाम असा झाला आहे की सर्व प्रकारच्या वार्षिक तुटीचा बोजा सोसायटीला सहन करणे भाग पडत आहे.

ही कारणे परिणामी घातक असून कॉलेजपुढे मोठी कठीण समस्या निर्माण झाली आहे. सर्व बाजूंनी कॉलेज अशा अडचणीत सापडले असून त्या दूर करण्यास ते असमर्थ आहे. कॉलेजला वार्षिक ग्रँट नाकारण्यात आल्यामुळे फी च्या अल्प प्रमाणामुळे आणि प्रतिस्पर्धी कॉलेजमुळे आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. पगाराच्या असमर्थ नि भारी प्रमाणामुळे (Scale) खर्चाची बाजू वाजवीपेक्षा जड झाली आहे.

कॉलेजचे भवितव्य पूर्णपणे या अडचणीच्या निरसनावर अवलंबून आहे आणि उस्मानिया युनिव्हर्सिटी व संस्थानी सरकार यांच्या जोड प्रयत्नांनी त्या दूर केल्या जाऊन कॉलेजचे भवितव्य सुरक्षित आणि निर्भय केले जाईल अशी मला उमेद आहे. सोसायटीला काही खास सवलत (Favour) नको, जे काही पाहिजे आहे ते कार्यासाठी चांगले आणि मोकळे क्षेत्र !

मला अधिकृत अशी काही माहिती नाही, पण मी असे ऐकतो की आमच्या सोसायटीच्या कॉलेजला काही वार्षिक ग्रँट देण्याचे हैद्राबाद सरकारने ठरविले आहे. ही मोठी अभिनंदनीय बातमी आहे आणि ती खरी असेल तर मदतीबद्दल संस्थानी मंत्र्याचा मी फार आभारी आहे. उपकुलगुरुंनी कॉलेजच्या मार्गातील इतर अडचणी दूर करणे एवढेच आता बाकी राहते. मी त्यांना विनंती करतो की, उस्मानिया युनिव्हर्सिटीचे कॉलेज औरंगाबादेहून दुसऱ्या एखाद्या ठिकाणी हलविण्यात यावे आणि मुंबई राज्यातील लगतच्या जिल्ह्यातील कॉलेज-फी च्या प्रमाणात आम्हाला फी वाढ करण्याची परवानगी मिळावी. माझ्या विनंतीचा ते विचार करतील अशी मला आशा आहे.

सोसायटीने मोठी घोंड शिरावर घेऊन हे कॉलेज सुरू केलेले आहे. ती घोड किती आहे याची फारच थोड्यांना कल्पना आहे. हैद्राबाद संस्थानातील उन्नतीसाठी निजाम सरकारने उभारलेल्या एक कोटी रुपयांच्या ‘शेड्यूल्ड कास्ट्स् ट्रस्ट फंडातून बारा लाख रुपये कर्ज घेऊन सोसायटीने हे कॉलेज सुरू केलेले आहे. आम्हाला कर्ज बिनव्याजी दिल्याबद्दल फंडाच्या बोर्डाांचा मी आभारी आहे. उपकार मानण्यासारखीच ही गोष्ट असली तरी वार्षिक 50,000 (पन्नास हजार) रुपयांच्या हप्त्यांनी हे कर्ज फेडावयाचे आहे. ही गोष्ट सोसायटीला दृष्टीआड करता येणार नाही. ही परतफेड 1956 पासून सुरू होणार आहे. या बारा लाख रुपये कर्जातून इमारत आणि इतर सामान-सुमान यावर खर्च करावयाचा होता. आतापर्यंत उपकरणे आणि फर्निचर यावर तीन लाख रुपये खर्च झालेले आहेत. हे वजा जाता साधारणपणे नऊ लाख रुपये सोसायटीच्या हातात राहातात. कॉलेजच्या इमारतीसाठी वीस लाख रुपये लागतील असा अंदाज आहे. म्हणजे सोसायटीच्या बजेटात साधारणपणे अकरा लाख रुपयांची तूट येते. सोसायटीची स्वतःची अशी काही तरतूद नाही. ही तूट भरून काढण्यासाठी सोसायटीला लोकांच्या देणगीवर अवलंबून राहावे लागते. सोसायटीने अंगीकारलेले कार्य पूर्णपणे बिनराजकीय स्वरूपाचे आहे. ते सर्वस्वी शैक्षणिक आणि सांस्कृतिक आहे. ज्याला इच्छा आणि शक्ती आहे अशा कुठल्याही राजकीय पक्षाच्या माणसाला या कार्यासाठी मदत करता येणे शक्य आहे. हैद्राबाद संस्थानातील मराठवाडा आणि औरंगाबादेतील जनतेला तसेच हैद्राबाद संस्थानाबाहेरील जनतेला उदार हाताने देणगी देऊन या शैक्षणिक कार्याला उत्तेजन देण्याची सोसायटीच्या वतीने मी विनंती करतो. मला आशा आहे की पुष्कळ लोक माझ्या विनंतीला मान देतील. आपले ध्येय साध्य करण्यासाठी सोसायटी किती अडचणीतून जात आहे हे यावरून दिसून येईल. सोसायटीवर दुहेरी ओझ्याचा भार आहे. इमारत पूरी करण्यासाठी अकरा लाख रुपयांची आणि तद्नंतर कर्ज फेडण्यासाठी वर्षाला पन्नास हजार रुपयांची तरतूद करावयाची आहे. तरीसुद्धा इमारत बांधणीस अनुकूल परिस्थिती येऊन पैसे मिळेपर्यंत सोसायटी थांबणार नाही. इमारतीचे काम सोसायटीला ताबडतोब सुरू करावयाचे आहे. मला आशा आहे की हा सोसायटीच्या कार्याविषयीच्या तळमळीचा आणि निश्चयाचा दाखला समजण्यात येईल. लोक जेव्हा प्रत्यक्ष काम सुरू असलेले पाहातील तेव्हा देणग्या मिळत जातील; असा सोसायटीला आत्मविश्वास वाटतो. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कॉलेजची इमारत भव्य आणि शोभिवंत अशीच होणार आहे. शिल्पकलेच्या दृष्टीने तर औरंगाबाद शहराचा ती अलंकार ठरणार आहे.

हिंदू समाजाच्या अगदी खालच्या थरातून आल्यामुळे शिक्षणाचे किती महत्त्व आहे हे मी जाणतो. खालच्या समाजाची उन्नती करण्याचा प्रश्न आर्थिक असल्याचे मानण्यात येते. पण ही मोठी चूक आहे. हिंदुस्थानातील दलित समाजाची उन्नती करणे म्हणजे त्यांच्या अन्न, वस्त्र व निवाऱ्याची सोय करून पूर्वीप्रमाणेच त्यांना उच्च वर्गाची सेवा करावयास लावणे नव्हे.. ज्याच्यामुळे प्रगती खुंटून त्यांना दुसऱ्याचे गुलाम व्हावे लागते तो न्यूनगंड खालच्या वर्गाची त्यांच्यातून नाहीसा करणे, चालू समाजपद्धतीमुळे जे त्यांचे जीवन निर्दयपणे लुबाडण्यात आले आहे त्याचे त्यांच्या स्वतःच्या आणि राष्ट्राच्या दृष्टीने काय महत्त्व आहे याची त्यांना जाणीव करून देणे हाच खालच्या वर्गाचा प्रश्न आहे. उच्च शिक्षणाच्या प्रसाराखेरीज कशानेच हे साध्य होणार नाही. आमच्या सर्व सामाजिक दुखण्यावर माझ्या मताप्रमाणे, हेच औषध आहे.

अध्यक्ष महाराज, शिक्षण प्रसाराच्या कार्यासाठी काहीतरी करावे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न आहे. माझे स्वप्न मी सत्यसृष्टीत आणू शकलो याचा मला आनंद होत आहे. त्यापेक्षा कॉलेजच्या इमारतीची कोनशिला बसविण्यास आपण येथे आलात याचा मला अधिक आनंद होत आहे. कॉलेज इमारतीची कोनशिला बसविण्यास आणि आम्हाला आशीर्वाद देण्यास विद्या व संस्कृतीच्या दृष्टीने आपल्यापेक्षा योग्य कोणी व्यक्ती नाही. मी जे म्हणतो ती खुशामत नाही. मी म्हणतो त्यावर विश्वास असू द्या. अध्यक्ष महाराज आता मी आपणाला कोनशिला बसविण्याची विनंती करतो.

सदर भाषण जनता वृत्तपत्रात दिनांक 15 आणि 22 सप्टेंबर 1951 रोजी प्रसिद्ध झाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password